कोल्हापूर जिल्ह्यात रोजगार हमीतून दीड कोटीची कामे, सहा हजार कामांचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 06:21 PM2018-11-01T18:21:33+5:302018-11-01T18:23:16+5:30
रोजगार हमी योजनेतून आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ३७ हजार ६२७ मजुरांनी विविध कामे करून १ कोटी ३९ लाख रुपयांची मजुरी मिळविली. विहिरी खणणे, घरकुले बांधणे, रस्ते, गोठा, वृक्षलागवड, तुतू लागवड, आदी कामांचा समावेश आहे. प्रशासनाने २०१८-१९ या आर्थिक वर्षातील ६ हजार २९८ कामांचा आराखडा तयार केला आहे. त्यातील ४३३ कामे सध्या सुरू आहेत.
प्रवीण देसाई
कोल्हापूर : रोजगार हमी योजनेतून आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील ३७ हजार ६२७ मजुरांनी विविध कामे करून १ कोटी ३९ लाख रुपयांची मजुरी मिळविली. विहिरी खणणे, घरकुले बांधणे, रस्ते, गोठा, वृक्षलागवड, तुतू लागवड, आदी कामांचा समावेश आहे. प्रशासनाने २०१८-१९ या आर्थिक वर्षातील ६ हजार २९८ कामांचा आराखडा तयार केला आहे. त्यातील ४३३ कामे सध्या सुरू आहेत.
या योजनेंतर्गत जॉब कार्डधारक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, कर्ता पुरुष नसलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेतील लाभार्थी, वननिवासी लाभार्थी यांच्या हातांना कामे देण्यासाठी विविध कामे हाती घेतली आहेत. त्यांचे निकषही ठरवून दिले आहेत.
त्यानुसार जिल्ह्यात तुतूची लागवड, रोपवाटिका, विहिरी खणणे, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुले बांधणे, नाडेफ (गांडूळ खत व कंपोस्ट खत तयार करणे), रस्ते, जनावरांचा गोठा, ३३ कोटी वृक्षलागवड, फळबाग लागवड, शौचखड्डा, आदी कामे सुरू आहेत.
आॅक्टोबर महिन्यात ग्रामपंचायत विभागाकडील व शासकीय यंत्रणेकडील मिळून एकूण ४३३ कामे ३७ हजार ६२७ मजुरांनी केली आहेत. कामाप्रमाणे १९५ रुपयांपासून २१० रुपये प्रत्येक दिवसानुसार ही मजुरी देण्यात आली आहे. मेजरमेंट बुक (मोजमाप पुस्तक)मध्ये झालेल्या कामांची नोंद करून झालेल्या कामाच्या मजुरीचे पैसे सातव्या दिवशी मजुराला दिले जात आहेत.
आॅक्टोबर महिन्यातील अहवालानुसार ग्रामपंचायतीकडील ४११ कामे झाली असून, ३४२३३ मजुरांनी कामे केली आहेत; तर शासकीय यंत्रणेकडील २२ कामे झाली असून, यामध्ये ३३९४ मजुरांनी काम केले आहे.
‘रोहयो’तून या आर्थिक वर्षासाठी ६२९८ कामांचा प्रस्तावित आराखडा तयार केला आहे. यातील ४३३ कामे सध्या जिल्ह्यात सुरू असून, मागणीनुसार ती लाभार्थ्यांना दिली जाणार आहेत. ज्यांना या योजनेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये अर्ज करावा.
- अमित माळी,
उपजिल्हाधिकारी (रोहयो)