ऑक्सिजनअभावी १६० स्टील फौंड्री, फॅॅब्रिकेशन युनिटमधील काम थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:17 AM2021-06-03T04:17:31+5:302021-06-03T04:17:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींमधील स्टील फौंड्री, फॅॅब्रिकेशन युनिटमधील ६० ...

Work at 160 steel foundry, fabrication unit stopped due to lack of oxygen | ऑक्सिजनअभावी १६० स्टील फौंड्री, फॅॅब्रिकेशन युनिटमधील काम थांबले

ऑक्सिजनअभावी १६० स्टील फौंड्री, फॅॅब्रिकेशन युनिटमधील काम थांबले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध औद्योगिक वसाहतींमधील स्टील फौंड्री, फॅॅब्रिकेशन युनिटमधील ६० टक्के काम थांबले आहे. कोरोनाच्या स्थितीत उद्योगांना काम असूनही ऑक्सिजनअभावी त्यांची अडचण झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्राची असणारी गरज भागवून शिल्लक राहणाऱ्या ऑक्सिजनसाठ्यातील किमान वीस टक्के ऑक्सिजन औद्योगिक क्षेत्रासाठी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय आणि खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनची गरज असल्याने औद्योगिक क्षेत्रातील पुरवठा थांबविण्यात आला. अत्यावश्यक सेवेतील उद्योगांना मात्र, ऑक्सिजन पुरविण्यात येत होता. शिवाजी उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे ६० स्टील फौंड्री आणि इंडस्ट्रीयल फॅॅब्रिकेशनचे काम करणारी १०० युनिटस आहेत. या फौंड्रीमध्ये कास्टिंग उत्पादन करतानाच्या रनर आणि रायझर प्रक्रियेत ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्याशिवाय उत्पादन प्रक्रिया पुढे सरकत नाही. शेती अवजारे, साखर कारखान्यातील यंत्रे, आदीसाठी लागणाऱ्या अवजारांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन लागतो. मात्र, गेल्या एक महिन्यापासून त्यांना ऑक्सिजन मिळाला नसल्याने या फौंड्री, युनिट्समधील ६० टक्के काम थांबले आहे. छोटे कास्टिंग निर्मितीची कामे सुरू आहेत. साखर कारखाने, निर्यात करणाऱ्या उद्योगांची कामे असूनही ऑक्सिजन अभावी या फौंड्री, फॅॅब्रिकेशन युनिटमध्ये काम करणे अडचणीचे ठरत आहे.

उद्योजकीय संघटनांचे पदाधिकारी काय म्हणतात?

सध्या वैद्यकीय क्षेत्राची गरज भागवून जिल्ह्यात ३० टक्के ऑक्सिजन शिल्लक राहत आहे. त्यातील २० टक्के ऑक्सिजन उद्योगांना देऊन उर्वरित १० टक्के बफर म्हणून जिल्हा प्रशासनाने शिल्लक ठेवावा, अशी मागणी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे. त्यांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत.

-श्रीकांत पोतनीस, अध्यक्ष, गोशिमा

कोरोनाच्या कठीण काळातही सुदैवाने उद्योगांना चांगले काम आहे. साखर कारखाने, शेती, पॉवर प्लँट, आदी क्षेत्राला लागणाऱ्या कास्टिंग निर्मितीसाठी ऑक्सिजन लागते. ऑक्सिजनअभावी स्टील फौंड्री, फॅॅब्रिकेशन युनिट्मधील ६० टक्के काम बंद आहे. काम चालू राहण्यासाठी ऑक्सिजन लवकर मिळणे आवश्यक आहे.

-सुमित चौगुले, अध्यक्ष, आयआयएफ

ऑक्सिजनअभावी जिल्ह्यातील उद्योगांची अडचण झाली आहे. उत्पादन प्रक्रिया थांबत असल्याने नुकसान होत आहे. सध्या ऑक्सिजन उत्पादनाचे प्रमाण वाढले आहे. त्याचा विचार करून आणि औद्योगिक क्षेत्राची गरज लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने उद्योगांना ऑक्सिजन देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा.

-दिनेश बुधले, सचिव, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन

ऑक्सिजन उपलब्ध होत नसल्याने गेल्या महिन्याभरापासून फौंड्री, फॅॅब्रिकेशन युनिटमधील कामाची गती मंदावली आहे. त्याचा परिणाम उद्योग चक्रावर होत आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा.

-गोरख माळी, अध्यक्ष, मॅॅक

चौकट

रोज १५ टन ऑक्सिजन शिल्लक

गोव्याला पाठविण्यात येणारा दहा टन ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे. कोल्हापुरातील तीन वितरकांकडूनही ऑक्सिजन पुरवठा वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यात रोज सुमारे १५ टन ऑक्सिजन शिल्लक राहत आहे.

Web Title: Work at 160 steel foundry, fabrication unit stopped due to lack of oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.