शिक्षक, संस्थाचालकांकडून काळ्या फिती लावून काम
By Admin | Published: January 6, 2015 11:38 PM2015-01-06T23:38:40+5:302015-01-08T00:06:06+5:30
शासनाने दखल न घेतल्यास २ फेब्रुवारीपासून शाळा, महाविद्यालये बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहेत.
कोल्हापूर : सुधारित आकृतिबंध लागू करावा, पूर्वीप्रमाणे वेतनेतर अनुदान मिळावे, कोणत्याही परिस्थितीत एक तारखेला वेतन मिळावे, शिक्षक भरतीवरील बंदी उठवावी, अशा विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालकांनी आज, मंगळवारी काळ्या फिती लावून काम केले. असहकार आंदोलनाची सुरुवात संबंधितांनी केली.शासनाने २ मे २०१२ पासून शिक्षकभरतीवर बंदी आणली आहे. त्यामुळे अनेक शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम गुणवत्तावाढीवर होत आहे. २३ आॅक्टोबर २०१३ रोजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर सेवकांसाठी सुधारित आकृतिबंध लागू झाला. तो अन्यायकारक असून रद्द करावा. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन झाल्याशिवाय संंबंधित शाळेतील शिक्षकांचे पगार मूळ शाळेतून काढावे. वेतनेतर अनुदान सर्वांना पूर्वीप्रमाणे मिळावे, डी. एड्. व बी. एड्. झालेल्यांना पुन्हा टीईटी देण्याची अट रद्द करावी, अशा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थाचालक यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी असहकार आंदोलनातील पहिला टप्पा म्हणून संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज काळ्या फिती लावून काम केले. यात जिल्ह्यातील सर्व शाळा सहभागी झाल्या होत्या. मागण्या मान्य होईपर्यंत शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, विभागीय परीक्षा मंडळ, आदींनी बोलाविलेल्या सर्व बैठकींना बहिष्कार टाकणे असे असहकार आंदोलन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे टप्पाटप्प्याने आंदोलन तीव्र करू. सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये १३ जानेवारीला बंद ठेवू. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येईल. त्यानंतरही शासनाने दखल न घेतल्यास २ फेब्रुवारीपासून शाळा, महाविद्यालये बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहेत.
- के. बी. पवार, अध्यक्ष,
कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ