चिचडोह प्रकल्पाचे काम प्रगतीवर
By admin | Published: June 18, 2017 01:24 AM2017-06-18T01:24:37+5:302017-06-18T01:24:37+5:30
जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील प्रस्तावित बंधाऱ्यांपैकी चिचडोह बंधारा, कोटगल उपसा सिंचन,
वर्षभरात काम पूर्ण होणार : माजी आमदारांसह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील प्रस्तावित बंधाऱ्यांपैकी चिचडोह बंधारा, कोटगल उपसा सिंचन, हल्दीपुराणी उपसा सिंचन या प्रकल्पांना काँग्रेसच्या काळात प्रशासकीय मान्यता देऊन निधीची तरतूद करण्यात आली. चामोर्शी तालुक्यातील चिचडोह प्रकल्पाला तत्कालीन सरकारने १५२ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला. सदर प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून हे काम वर्षभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चिचडोह प्रकल्पाच्या कामाची पाहणी नुकतीच केली. यावेळी काँग्रेसचे महासचिव प्रभाकर वासेकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग घोटेकर, चामोर्शी तालुकाध्यक्ष निशांत नैताम, विनोद खोबे, वैभव भिवापुरे, प्रमोद भगत, विजय शातलवार तसेच काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसच्या तत्कालीन राज्य सरकारने हल्दीपुराणी उपसा सिंचन योजनेस ४५ कोटी व कोटगल उपसा सिंचन प्रकल्पाला ५५ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला, असे माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी म्हटले आहे. विद्यमान भाजपप्रणित राज्य सरकारने कोटगल व हल्दीपुराणीचा सिंचन प्रकल्पास पुरेसा निधी उपलब्ध करून न दिल्यामुळे या प्रकल्पाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. भाजप सरकारने व लोकप्रतिनिधींनी या सिंचन प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्यास हे प्रकल्प पूर्ण करण्यास पाच ते सहा वर्षाचा कालावधी लागेल. तसेच या प्रकल्पाची किंमत वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे डॉ. उसेंडी यांनी म्हटले आहे. ७८ टक्क्यांपैकी अर्धा टक्के वनजमीन सरकारने प्रकल्पांना दिल्यास हे प्रकल्प मार्गी लागू शकतात. मात्र यासाठी इच्छाशक्ती आवश्यक आहे.