संमेलनातून साहित्य संस्कृती जोडण्याचे कार्य
By admin | Published: November 30, 2015 01:01 AM2015-11-30T01:01:40+5:302015-11-30T01:07:37+5:30
श्रीपाल सबनीस : कारदगा येथे साहित्य विकास मंडळाच्या २०व्या मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
तानाजी घोरपडे-- कारदगा--महाराष्ट्र राज्यातील साहित्य संस्कृती जोडण्याचे तसेच भाषा, प्रांत, आदी वाद-विवाद संपविण्याचे महत्त्वाचे कार्य कारदगा साहित्य संमेलनाने केले आहे. या संमेलनामुळे ग्रामीण माणसाची साहित्याशी असलेली नाळ कायमस्वरूपी जोडून ठेवण्याचे कामही केले आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड येथे जानेवारी २०१६ मध्ये होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. कारदगा (ता. चिक्कोडी) येथील साहित्य विकास मंडळाने आयोजित केलेल्या २०व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. गोदाबाई गावडे यांनी स्वागत केले. महाराष्ट्र राज्य कोकण विभागाचे आयुक्त तानाजी सत्रे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, राजयोगीनी ब्रह्माकुमारी सुनंदा बहेनजी, बिद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, प्राचार्य सुनीलकुमार लवटे, खासदार प्रकाश हुक्केरी, कोल्हापूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने उद्घाटन झाले. अथिती परिचय मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब नाडगे व महादेव दिंडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नवोदित लेखक साताप्पा सुतार यांच्या ‘बाळक्याची वरात’ या कथासंग्रहाचे व लोकूर (ता. अथणी) येथील आप्पासाहेब पवार यांच्या ‘पाऊलवाट’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले. तसेच विविध गुणीजनांचा सत्कारही करण्यात आला. दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, कागदोपत्री धरणे बांधून गरीब शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळत नाही. कर्जबाजारीपणाचे ओझे पेलवत नसल्याने हजारो शेतकरी आज आत्महत्या करू लागले आहेत. त्यामुळे राजकारण्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले याबाबतचा जाब साहित्यिकांनी विचारायला हवा. खासदार प्रकाश हुक्किरे म्हणाले, साहित्य संमेलनामुळे लोकसंस्कृतीचे दर्शन घडते. अशा प्रकारच्या उपक्रमास पाठबळ देण्यासाठी, तसेच साहित्य विकास मंडळाच्या इमारत बांधकामासाठी निधी उपलब्ध
द्यावा. राजयोगीनी सुनंदाबहेनजी म्हणाल्या, साहित्याचे महत्त्व मानवी जीवनात अमूल्य आहे. या साहित्याचा आस्वाद घेऊन प्रत्येकाने जीवन सुंदर व आनंदी बनविण्याची गरज आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, ग्रामीण साहित्य संमेलनाच्या आयोजनामुळे ग्रामीण नवोदित कवी, लेखकांना व्यासपीठ मिळते, साहित्य हा कोणत्या जाति-धर्माचा, भाषेचा याला महत्त्व नसून त्या साहित्यिकाने त्याच्या साहित्यातून समाजाला कोणता विचार दिला आहे, हे महत्त्वाचे असते.
साहित्य संमेलनाने सर्वांना मोहीत केले
आतापर्यंत आपण तीन हजार व्याख्याने दिली आहेत. अनेक समारंभ पाहिले आहेत. मात्र, येथील साहित्य संमेलनाएवढी उंची मी कधीही पाहिलेली नाही. येथील ग्रामीण संस्कृती, साहित्याची ओढ असणारी माणसं संमेलनामध्ये सहभागी असणारे सर्व जाती-धर्माचे, पंथांचे अनुयायी यामुळे साहित्य संमेलनाने आम्हा सर्वांना मोहीत करून टाकले आहे. येथील साहित्य संस्कृती पाहून आपण धन्य झाल्याचे सबनीस यांनी सांगितले.
गं्रथदिंडीत चित्ररथाद्वारे ग्रामीण दर्शन
दत्तात्रय पाटील ल्ल म्हाकवे
कारदगा येथील २०व्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या गं्रथदिंडीमध्ये कारदगा परिसरातील शाळा, कॉलेजसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. चित्ररथातून ग्रामीण दर्शन घडवून भारतीय संस्कृती, अठरापागड जातीतील बंधू-भाव, त्यांच्यातील ऋणानुबंध आणि नवनवीन संदेशही देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र, कर्नाटकातील मान्यवर, साहित्यिक आणि सर्व जाती-धर्माचे नागरिक सहभागी झाले होते.
गेल्या दोन दशकांपासून कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे नोव्हेंबरच्या शेवटच्या रविवारी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. त्यामुळे सीमाभागातील नागरिकांची पावले या रविवारी डी. एस. नाडगे कॉलेज पटांगणातील संमेलनाकडे आपोआप वळतात.
श्री ज्योतिर्लिंग मंदिरापासून ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला. संमेलनस्थळी दिंडी येताच बोरगाव येथील अरिहंत मराठी कॉन्व्हेंट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर ‘नाडगीत’ल गाऊन संमेलनास प्रारंभ करण्यात आला.
कारदगातील मुख्य मार्गावरून चित्ररथासह पारंपरिक हलगी, ढोल-वादनासह टाळ-मृदुंगाच्या सहवासात दिंडी काढली. दिंडीतील चित्ररथातून छत्रपती शिवाजी महाराजांचा दरबार, ग्रामीण भागातील दिनचर्येत घरातील वयोवृद्ध माऊली ताक घुसळताना, जात्यावर दळण करताना, धान्य निवडणारी महिला तसेच सुतार, गवंडी, बुरूड, आदी बाराबलुतेदारांचे काम, शिंपी, सोनार यांची कलाकृती साकारण्यात आली होती.
छत्रपती शाहू महाराज, ताराराणी यांसह बाजारपेठही साकारली होती. यावेळी लोकनृत्य, लोकगीते यामुळे हे संमेलन अभूतपूर्व उंचीवर पोहोचले.
या चित्ररथामध्ये डी. एस. नाडगे हायस्कूल व कॉलेज, मराठी मुलांची शाळा, जंगली महाराज (सर्व कारदगा) अरिहंत मराठी शाळा, बोरगाव, एम. बी. एस. हायस्कूल, ममदापूर, इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, कोगनोळी या शाळांसह जमखंडी येथील बेंजोपथक, कारदगा येथील हनुमान झांज पथकाने सहभाग घेतला होता.
‘दुष्काळाच्या झळा’ चित्ररथ लक्षवेधी
पाऊस पडला नाही म्हणून निराश नसतं व्हायचं, मिळालं नाही पाऊसरूपी अमृत म्हणून विष नसतं प्यायचं, अशा फलकांद्वारे दुष्काळाचं ‘कटूसत्य’ पचविणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारा चित्ररथ सर्वांचेच आकर्षण ठरत होता. यामध्ये गळफास घेतलेल्या शेतकऱ्यांची प्रतिकृतीही साकारली होती. शासकीय कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन जरूर लागू करा; परंतु दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळणाऱ्या ‘जगाच्या पोशिंद्याचाही विचार करा’, स्वाभिमानी आयोगाची शिफारस लागू करा, शेतमालाला हमीभाव द्या, अशा मागण्याही या चित्ररथाच्या माध्यमातून चिमुकल्याने केल्या.