विभागीय क्रीडा संकुलाचे काम अपूर्णच
By admin | Published: December 24, 2014 11:55 PM2014-12-24T23:55:55+5:302014-12-25T00:01:13+5:30
कोल्हापूरच्या क्रीडा विश्वासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा प्रकल्प म्हणून विभागीय क्रीडा संकुलाकडे पाहिले जाते
मावळत्या वर्षात क्रीडा क्षेत्रात राही सरनोबत हिने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर ५० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णवेध घेतला, तर कोल्हापूरचं क्रीडा वैभव ठरू पाहणारे व नवीन खेळाडू घडविण्यासाठी सुसज्ज अशा विभागीय क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करण्यात क्रीडा संचलनालय कमी पडले. कोल्हापूरचे संस्थानकालीन खासबाग कुस्तीच्या मैदानाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आॅलिम्पिकवीरांची कोल्हापूर भेटही अविस्मरणीयच ठरली. अशा एक ना अनेक घटनांनी सरते वर्ष ‘कभी खुशी, कभी गम’ अशा स्वरूपात गेले.
आॅक्टोबर महिन्यात ‘आॅलिम्पिक गोल्ड क्विस्ट’ या संस्थेतर्फे कोल्हापूरकरांच्या भेटीला आलिम्पिकवीरांना आणले होते. यावेळी योगेश्वर दत्त, हीना सिंधू, राही सरनोबत, गगन नारंग, गीत सेठी, तरुणदीप राय, वीरेन रासक्विन्हा, अपूर्वी चंदेला, श्वेता चौधरी, प्रकाश नंजप्पा, संजीव राजपूत, के. टी. इरफान, अन्नुराजसिंग, पूजा धारकर, देवेंद्रोसिंग, या आॅलिम्पिकवीरांचा गौरव करण्यात आला. कोल्हापूरच्या क्रीडा विश्वासाठी महत्त्वपूर्ण ठरणारा प्रकल्प म्हणून विभागीय क्रीडा संकुलाकडे पाहिले जाते. अशा या संकुलाचे काम गेले कित्येक वर्षे या ना त्या कारणांनी कासवगतीने सुरू आहे. यात गेल्या सात महिन्यांपासून तर संकुलाचे काम पूर्ण ठप्प झाले होते. यात विभागीय क्रीडा संकुलाच्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विभागीय क्रीडा संकुलाचे आतापर्यंतचे कामकाज, दर्जा, उर्वरित कामे यासाठी आवश्यक निधी यांचा सविस्तर आढावा घेतला. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी मागणीप्रमाणे वाढीव दराने किती खर्च केला जाईल, असा प्रस्ताव तयार करावा, असे सांगून या क्रीडा संकुलाचे काम उर्वरित कामांसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याबाबत चर्चा केली. गेली अनेक वर्षे अनेक समस्यांनी मोडकळीस आलेली व आंतरराष्ट्रीय नेमबाज जयसिंग कुसाळे, रमेश कुसाळे, तेजस्विनी सावंत, सध्याचे जिल्हा क्रीडाधिकारी नवनाथ फरताडे, आदींचा नेमबाजीचा प्राथमिक सराव ज्या शूटिंग रेंजवर झाला, त्या दुधाळी मैदान येथील शूटिंग रेंजचाही कायापालट करण्याचे निर्देश सहकार व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. यंदाच्या शालेय स्पर्धेत नव्याने ३३ खेळांचा समावेश केला. यामध्ये नव्याने लंगडी या खेळाचा समावेश केला. काही खेळ तर असोसिएशनना खूश करण्यासाठी केल्याचे खुद्द खेळाडूंकडून बोलले जात आहे. अशा संमिश्र घटनांनी कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राचे सरते वर्ष गेले.
आॅनलाईन नोंदणीचा आदर्श
कोल्हापूर जिल्हा क्रीडाधिकारी व आंतरराष्ट्रीय नेमबाज नवनाथ फरताडे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्ह्यातील शालेय स्तरावरील सर्व वयोगटांतील खेळाडूंची आॅनलाईन नोंदणी केली. खेळाडूचे वय, खेळाचा प्रकार, शाळा, पत्ता यांची नोंद एकाच क्लिकवर केली. या संगणकीय प्रणालीचा आदर्श राज्यातील इतर जिल्हा क्रीडा कार्यालयांनी घेतला.
खासबाग मैदानाचा कायापालट
गेले कित्येक वर्षे कुस्तीची पंढरी समजल्या जाणाऱ्या खासबाग कुस्तीच्या मैदानाचा कायापालट झाला नव्हता. मात्र, पूर्वीच्याच धाटणीचे मैदान बनविण्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. लवकरच कुस्त्यांच्या जंगी मैदानासाठी ही पंढरी खुली होईल.
-
राही व तेजस्विनीचा सुवर्णवेध
राही सरनोबत हिने जुलै महिन्यात ग्लासगो येथील कॉमनवेल्थ गेममध्ये २५ मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक, तर सप्टेंबर महिन्यात इन्चीयुन येथे झालेल्या एशियन गेम्समध्ये २५ मीटर सांघिक पिस्तूल प्रकारात सांघिक कांस्यपदकाची कमाई केली.
सचिन भोसले