प्रारूप मतदार याद्यांचे काम आजपासून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:16 AM2021-02-05T07:16:39+5:302021-02-05T07:16:39+5:30

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारपासून (उद्या) प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम प्रशासनातर्फे केले जाणार ...

Work on the draft voter lists starts from today | प्रारूप मतदार याद्यांचे काम आजपासून सुरू

प्रारूप मतदार याद्यांचे काम आजपासून सुरू

Next

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने गुरुवारपासून (उद्या) प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम प्रशासनातर्फे केले जाणार आहे. त्याकरिता राज्य निवडणूक आयोगाकडून १५ जानेवारी रोजी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार याद्या संकलित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या कामासाठी लागणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्याही बुधवारी सायंकाळी उशिरा करण्यात आल्या.

कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिलच्या १५ तारखेच्या दरम्यान होणार आहे. त्याअनुषंगाने प्रारूप प्रभाग रचना तसेच आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यावरील हरकती, सुनावणी होऊन प्रभाग रचना तसेच आरक्षणे अंतिम करण्यात आली आहेत. त्याबाबतचे अध्यादेश गुरुवारी (उद्या) किंवा शुक्रवारी (परवा) निघण्याची शक्यता आहे. निवडणुकीतील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या फोडण्याचे काम सुरू होत आहे.

दि. १५ जानेवारीस अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असल्याने बुधवारी राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून ती घेण्याचे काम सुरू होते. पण, काही तांत्रिक अडचणीमुळे ती घेता आली नाही. उद्या, गुरुवारी ती उपलब्ध होईल. त्यानंतर त्याची हार्डकॉपी तसेच सॉफ्ट कॉपी घेऊन त्या प्रभागनिहाय फोडण्यात येणार आहेत. हे काम चार विभागीय कार्यालयस्तरवर होणार आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयाकडील उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंता यांना प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांच्या आदेशावर प्रभारी प्रशासक तथा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी रात्री सही केली.

प्रारूप मतदार याद्या तयार करण्याचे काम दि. १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करून त्या लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. १६ फेब्रुवारीस जाहीर करायच्या आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या हातात अजून आठ- नऊ दिवस बाकी आहेत. या दिवसांत ८१ प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्या तयार करायच्या असल्यामुळे प्रशासनाची दमछाक होणार आहे. प्रशिक्षणार्थी उपायुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम होत आहे.

Web Title: Work on the draft voter lists starts from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.