शिराळे-वारूण येथील पेयजल योजनेचे काम बारगळले

By admin | Published: February 7, 2017 11:21 PM2017-02-07T23:21:13+5:302017-02-07T23:21:13+5:30

काम मंजुरीस दोन वर्षे लोटली : ३० वर्षांपूर्वीची पाण्याची टाकी सध्या अपुरी

Work on drinking water scheme in Shirala-Varun | शिराळे-वारूण येथील पेयजल योजनेचे काम बारगळले

शिराळे-वारूण येथील पेयजल योजनेचे काम बारगळले

Next

शित्तूर-वारूण : शिराळे-वारूण (ता. शाहूवाडी) येथील गावच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघावा या हेतूने ‘राष्ट्रीय पेयजल योजनें’तर्गत नळापाणी पुरवठ्याचे काम मंजूर केले आहे. हे काम मंजूर होऊन अद्याप दोन वर्षे उलटून गेली तरी प्रत्यक्षात या कामास कोणत्याही प्रकारची सुरुवात झालेली नाही. याबाबत येथील नागरिक संजय पाटील यांनी माहिती अधिकाराचा वापर करत या पेयजल योजनेची माहिती उघडकीस आणली असून, या बारगळलेल्या कामाबाबतची तक्रार थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार निवारण पोर्टलवर नोंदवलेली आहे.
गावचा वाढलेला विस्तार आणि वाढलेल्या लोकसंख्येस सुमारे ३० वर्षांपूर्वीची २००० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी सध्या पाणीपुरवठ्यासाठी अपुरी पडत आहे. गावच्या पाणीपुरवठ्यामध्ये सातत्याने येणारा व्यत्यय दूर व्हावा आणि गावाला सुरळीतपणे पाणीपुरवठा व्हावा यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून नळपाणीपुरवठ्याचे काम दि. २१ जुलै २०१४ रोजी तांत्रिक मान्यता क्र. ३१ नुसार अंदाजपत्रकीय रक्कम ४८,८७,५००/- मंजूर झाले असले तरी अद्याप या कामास सुरुवात झालेली नाही. ग्रामपंचायतीच्या आवारात मोठ-मोठे पाईप्स कित्येक दिवसांपूर्वीच येऊन पडल्या आहेत. हे काम सचिन शामराव पाटील या ठेकेदारानी घेतले असून, या योजनेचे काम कोणत्याही प्रकारे चालू नसल्याचा खुलासा ग्रामसेवक सम्राट घोलप यांनी माहितीत केला आहे. (वार्ताहर)


काम लवकर करण्यासाठी प्रयत्नशील : रामचंद्र पाटील
यासंदर्भात शिराळे-वारूणचे सरपंच रामचंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, नदीलगत पाणीपुरवठ्यासाठी असणारी जुनी विहीर फक्त १० फूट खोल असून स्टेज गॅलरी करण्यासाठी नव्या बांधकामास आणखी १० फूट खोदकाम करावे लागणार असून, सध्याच्या इस्टिमेंटमध्ये त्याची तरतूद नाही. त्यामुळे नवीन इस्टिमेंट करणे गरजेचे आहे.
इस्टिमेंटबदलाची प्रक्रिया सध्या सुरू असून, या कामासाठी लागणारे साहित्यही गावामध्ये येऊन पडले आहे. त्यामुळे काम पूर्णत: बंद नसून ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: Work on drinking water scheme in Shirala-Varun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.