आठ प्रकल्पांचे काम वर्षभरात मार्गी

By admin | Published: May 30, 2016 01:25 AM2016-05-30T01:25:17+5:302016-05-30T01:26:20+5:30

एकनाथ खडसे यांची घोषणा : तमनाकवाडा पाणी परिषद; प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी रेडिरेकनरच्या पाचपट दराने घेणार

Work of eight projects in a year | आठ प्रकल्पांचे काम वर्षभरात मार्गी

आठ प्रकल्पांचे काम वर्षभरात मार्गी

Next

कोल्हापूर : प्रकल्पग्रस्तांच्या वेदना काय असतात, याची जाणीव आपणाला असून नागनवाडीसह कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित आठ प्रकल्पांचे काम येत्या वर्षभरात मार्गी लावले जातील. प्रकल्पग्रस्तांशी चर्चा व सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करत असून वेळप्रसंगी नियमांत दुरूस्ती करावी लागली तरी बेहत्तर, पण कोणत्याही परिस्थितीत येथील प्रकल्पांचे काम पूर्ण केले जाईल, अशी घोषणा महसूल व पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे यांनी केली.
तमनाकवाडा (ता. कागल) येथे सर्वपक्षीय पाणी परिषदेत ते बोलत होते. युती सरकारच्या काळात पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पांना कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना करून गती दिल्याचे सांगत मंत्री खडसे म्हणाले, ‘भूमिपूजन ते जलपूजन’ असे धोरण राज्य सरकारने अवलंबले आहे. भूमी संपादनाच्या प्रक्रियेत अनेक प्रकल्प अडकले आहेत. शेतकरी जमिनी देण्यास तयार आहेत, पण त्यांना योग्य मोबदला दिला पाहिजे. घरदार सोडून जाताना सगळ्यांनाच वेदना होतात, मीही एक प्रकल्पग्रस्त असल्याने त्यांच्या भावना काय असतात, याची जाणीव मला आहे. नागनवाडी प्रकल्पासह कोल्हापूर जिल्ह्णातील इतर प्रलंबित प्रकल्पांचा प्रश्न एका दिवसात सुटणारा नसला तरी काळजी करू नका. त्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी दिली असून दर तीन महिन्याला मंत्रालयात या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. वेळप्रसंगी नियमांत दुरूस्ती करावी लागली तरी बेहत्तर पण वर्षभरात हे प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही खडसे यांनी दिली. रेडिरेकनरचा दर हेक्टरी पाच ते दहा लाख इतका कमी असल्याने प्रकल्पग्रस्त जमिनी देण्यास टाळाटाळ करतात, त्याच पैशांत दुसरीकडे त्यांना जमिनी मिळत नाहीत. यासाठी ग्रामीण भागात रेडिरेकनरच्या पाचपट तर शहरी भागात दुप्पट मोबदला देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जमिनीचा स्लॅब आठ एकरपर्यंत आहे, त्या पटीत जमिनी देण्यासाठी उपलब्ध नाहीत. जमिनीच्या बदल्यात शेतकऱ्यांनी पैशांची मागणी केली तर अडचणी कमी होतील, याबाबतही आम्ही विचार करत असल्याचे खडसे यांनी सांगितले.
नागनवाडीसह इतर प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी मंत्री खडसे व आपण ताकद पणाला लावू. पंधरा वर्षांत प्रलंबित असलेले प्रकल्प पूर्ण करण्याची आमची जबाबदारी असून त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. ठिबकबाबत सरकारने गांभीर्याने घेतले असून जे कारखाने याचा अवलंब करणार नाहीत, त्यांच्या सुविधा काढून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पाणी परिषदेच्या माध्यमातून प्रलंबित प्रकल्पांची पुनर्बांधणीची पायाभरणी झाल्याचे सांगत आपण या विभागाचा भूमिपुत्र असल्याने पुढाकार घेतल्याचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी सांगितले. भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, जलतज्ज्ञ आनंदराव पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, प्रा. संजय मंडलिक, संजय घाटगे, समरजितसिंह घाटगे यांनी मनोगत व्यक्त केले. नागनवाडी प्रकल्पाला गती देण्यासाठीच पाणी परिषदेचे आयोजन केले असून प्रकल्पपूर्तीने कापशी खोऱ्यासह कागल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात सुख-समृद्धी निर्माण होणार असल्याचे सांगत पाणी परिषदेचे संयोजक परशराम तावरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्वागत तमनाकवाडाचे सरपंच दत्तात्रय चव्हाण यांनी केले.
यावेळी आमदार अमल महाडिक, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, अंबरिश घाटगे, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, कागलचे सभापती श्रीकांत लोहार, उपसभापती भूषण पाटील, कल्पनाताई साळुंके, नाथाजी पाटील, प्रताप कोंडेकर, बाळासाहेब नवणे, अतुल जोशी, प्रताप कोंडेकर आदी उपस्थित होते.

पुनर्वसन वरदान ठरेल!
सरकारी धोरणामुळे प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित राहतात; त्यामुळे पुनर्वसन हे शेतकऱ्यांना शाप वाटत आहे; पण आगामी काळात त्याबद्दल चांगले निर्णय घेऊन पुनर्वसन वरदान वाटेल असे काम करू, अशी ग्वाही मंत्री खडसे यांनी दिली.

ठिबकसाठी ‘शाहू’चा पुढाकार
पाणीटंचाई पाहता ‘ठिबक’ ही काळाची गरज असून, त्यासाठी छत्रपती शाहू कारखाना मागे राहणार नाही. केंद्र व राज्य सरकारचे अनुदान तत्काळ शेतकऱ्यांना द्या. शाहू कारखाना उर्वरित अनुदान रूपात शेतकऱ्यांना मदत करील, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली. घाटगे यांचे कौतुक करीत याबाबत सरकार गांभीर्याने निर्णय घेणार असल्याचे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले.
हीच मंडलिक-राजे यांना श्रद्धांजली!
घाटगे-मंडलिक गटांतील कट्टरतेचे राजकारण जगजाहीर होते. एकमेकांत ते मुलीही देत नव्हते; पण विकासाच्या कामात मतभेद विसरून सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंहराजे घाटगे एकत्र येत होते. नागनवाडीचा प्रकल्पातून पूर्ण कापशी खोऱ्यातील शेतकरी सुखी व्हावा, हे या दोन्ही नेत्यांचे स्वप्न होते. हा प्रकल्प मार्गी लागला तर हीच मंडलिक व राजेंना खरी श्रद्धांजली असेल, असे समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.


भाजपकडून तावरे
यांना प्रोजेक्ट!
सर्वपक्षीय पाणी परिषद असली तरी तिच्या नेटक्या नियोजनासह भाजपची वातावरणनिर्मिती करण्यात जि. प. सदस्य परशराम तावरे यशस्वी झाल्याचे दिसते.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तावरे यांना प्रोजेक्ट केल्याची चर्चा कागलमध्ये सुरू आहे.

दादाच आमचे मुख्यमंत्री
आमदार प्रकाश आबिटकर यांनी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न अत्यंत पोटतिडकीने मांडले. पुनर्वसनासह प्रकल्पांचे प्रश्न तत्काळ सोडवा, विदर्भ-मराठवाड्याला खूप दिले, पश्चिम महाराष्ट्राने काय घोडे मारले आहे? निर्णय पटपट घ्या अन्यथा लोक आमच्याही उलटे जातील, असा इशारा देत, ‘दादा, सरकारदरबारी तुमच्या शब्दाला वजन आहे.’ देवेंद्र फडणवीस नव्हे तर दादाच आमचे मुख्यमंत्री असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.

Web Title: Work of eight projects in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.