जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्याचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:26 AM2021-05-07T04:26:39+5:302021-05-07T04:26:39+5:30
कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महिन्याभरातच दहा ...
कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महिन्याभरातच दहा कोटी रुपये मंजूर केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. वर्षभरात हा मजला पूर्ण होणार असून त्यामुळे अन्य विभागही या इमारतीत एकाच छताखाली येणार आहेत.
गेली काही वर्षे जिल्हा परिषदेच्या चैाथ्या मजल्याची चर्चा सुरू होती. शिवसेना-भाजपच्या राज्यात कोल्हापूर जिल्हा परिषद पहिल्यांदाच भाजप आणि मित्रपक्षांच्या ताब्यात आल्यामुळे चौथ्या मजल्यासाठी तातडीने निधी मिळेल अशी पदाधिकारी आणि सदस्यांना अपेक्षा होती. हा प्रस्तावही मंत्रालयातच पडून होता. परंतु कोल्हापूरचे तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यात फारसे सलोख्याचे संबंध नसल्याची चर्चा त्याहीवेळी जिल्हा परिषदेत होती. पदाधिकारी मुंबईला मुंडे यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांना जो अनुभव आला, त्याचीही चर्चा त्यावेळी झाली होती. परिणामी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्याचा निधी मिळाला नाही.
मात्र हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदाचा कार्यभार घेतल्यानंतर महिन्याभरातच सर्व सदस्यांना भरघोस निधी आणि चौथ्या मजल्यासाठी दहा कोटी रुपयांची घोषणा केली. कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे हा निधी मिळण्यास थोडा उशीर झाला. परंतु मुश्रीफ यांनी जातीने यामध्ये लक्ष घालून हा निधी गतवर्षी मंजूर केला. शरद पवार यांच्या हस्ते या कामाचा प्रारंभही करण्यात आला. याची निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदारही निश्चित करण्यात आला.
तिसऱ्या मजल्याच्या टेरेसवर सौरऊर्जेचे पॅनेल बसवले होते. ते काढण्यासाठी काही दिवस गेले. ते काढल्यानंतर आता तिसऱ्या मजल्याचा स्लॅबचा वरचा भाग ब्रेकरने काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे तिसऱ्या मजल्यावर सकाळपासून मोठा आवाज येत असून हे काम शनिवारी, रविवारी करावे अशीही मागणी होत आहे.
०६०५२०२१ कोल झेडपी ०१
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्याच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे.
छाया : समीर देशपांडे