जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्याचे काम लवकरच सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:26 AM2021-04-01T04:26:37+5:302021-04-01T04:26:37+5:30
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्याच्या बांधकामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. बांधकाम ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्याच्या बांधकामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. बांधकाम समिती सभापती हंबीराराव पाटील आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांनी ही माहिती दिली.
जिल्हा परिषदेच्या सध्याच्या इमारतीला एप्रिल महिन्यात २५ वर्षे पूर्ण होत आहेत. सध्या जिल्हा परिषदेची अनेक कार्यालये ही समोरील कागलकर वाड्यात कार्यरत आहेत. त्यामुळे ही सर्व कार्यालये कामकाजाच्या दृष्टीने एकत्र असावीत, यासाठी चौथा मजला आवश्यक होता. त्यासाठी प्रयत्न केले गेले परंतु त्याला यश आले नव्हते.
हसन मुश्रीफ हे राज्याचे ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर त्यांनी पहिल्या दोन महिन्यातच या कामासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. त्यातील प्रत्यक्ष बांधकामाची निविदा प्रसिध्द करण्यात आली असून ६ कोटी ७६ लाख रूपयांच्या या कामाचे ठेकेदारही ठरले आहेत. त्यांना पुढील आठवड्यात कार्यादेश देण्यात येणार असून त्यानंतर तातडीने कामास सुरूवात करण्यात येणार आहे. मे महिनाअखेरपर्यंत अधिकाधिक काम करण्याचे नियोजन सुरू आहे.
चौकट
सौरऊर्जा यंत्रणा काढावी लागणार
जिल्हा परिषदेच्या वीजखर्चात बचत करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी या इमारतीवर सौर ऊर्जा यंत्रणा उभारण्यात आली आहे. कृषी विभागाने महाउर्जाच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारला आहे. मात्र या बांधकामामुळे हे सोलर पॅनेल आता काढावे लागणार आहेत.