गडहिंग्लज पंचायत समितीचे काम प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:22 AM2021-02-12T04:22:40+5:302021-02-12T04:22:40+5:30
गडहिंग्लज : सर्वसामान्य नागरिकांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी शासनस्तरावर अनेक योजना राबविल्या जातात. ...
गडहिंग्लज : सर्वसामान्य नागरिकांच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत सुविधांचा प्रश्न कायमचा सुटावा यासाठी शासनस्तरावर अनेक योजना राबविल्या जातात. त्याची उद्दिष्टपूर्ती करण्याची जबाबदारी प्रशासनावर असते. ही जबाबदारी पार पाडून उद्दिष्टपूर्ती करण्याचे काम पाहिले तर गडहिंग्लज पंचायत समितीचे काम प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांनी काढले.
ग्रामीण महाआवास योजनेच्या कार्यशाळा आणि डेमो प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी गडहिंग्लज पंचायत समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील, सभापती रूपाली कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, डोक्यावर छत नसलेल्या नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने हा उपक्रम राबविला आहे. २०२२ अखेर सर्वांना या योजनेचा लाभ देऊन एकही व्यक्ती घराविना राहणार नाही यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. घराबरोबरच अन्य योजनांमधून नळपाणी, विद्युत जोडणी, सोलर, आदी सुविधांचाही त्यांना कमीत कमी खर्चात आधार देण्यात येणार आहे. गडहिंग्लज पंचायत समिती आपले उद्दिष्ट पूर्ण करून आदर्श मॉर्डल सर्वांसमोर ठेवून त्याचे बक्षीसही मिळवेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सतीश पाटील म्हणाले, पंचायत समितीच्या दालनातील बक्षिसे, प्रशस्तिपत्रकेच येथील कामाची पोहोचपावती देत असतात. विद्यमान आणि मागील पदाधिकारी, सदस्यांनी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे काम कौतुकास्पद आहे. तहसीलदार दिनेश पारगे म्हणाले, ज्या लाभार्थ्यांना स्वत:ची जागा नाही, अशा लाभार्थ्यांना गावठाणातील जागा उपलब्ध करून देण्यासह बांधकामासाठी वाळूची वाहतूक आणि अन्य कोणत्याही प्रकारचे महसूल विभागाकडील कामासाठी सर्वतोपरी सहकार्य राहील. यावेळी उपसभापती इराप्पा हसुरी, विजयराव पाटील, विद्याधर गुरबे, जयश्री तेली, रामाप्पा करिगार, श्रीया कोणकेरी, इंदुमती नाईक, अभय देसाई, महाबळेश्वर चौगुले, आदींसह तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.
-----
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे आमदार राजेश पाटील यांनी ग्रामीण महाआवास योजनेच्या कार्यशाळा आणि डेमो प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी विद्याधर गुरबे, दिनेश पारगे, विजयराव पाटील, सतीश पाटील, रूपाली कांबळे, श्रीया कोणकेरी, इराप्पा हसुरी उपस्थित होते.
क्रमांक : ११०२२०२१-गड-०१