कोल्हापुरातील १७४ पोलिसांना वर्क फ्रॉम होम, पण काम कोणते द्यायचे हाच प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 11:46 AM2022-01-08T11:46:02+5:302022-01-08T17:59:17+5:30
पन्नाशी ओलांडल्याने संगणकाचे आणि ऑनलाइन कामासाठीचे पुरेसे ज्ञान नसल्याने यांना वर्क फ्राॅम होमवेळी कोणते काम द्यायचे, असे प्रश्नचिन्ह येथील पोलीस दलासमोर आता निर्माण झाले आहे.
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : तिसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग गतीने होत असल्याने गृह विभागाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार शहर आणि जिल्ह्यातील ५५ वर्षांवरील १७४ पोलिसांना वर्क फ्रॉम होम योजनेचा लाभ होऊ शकतो. पन्नाशी ओलांडल्याने संगणकाचे आणि ऑनलाइन कामासाठीचे पुरेसे ज्ञान नसल्याने यांना वर्क फ्राॅम होमवेळी कोणते काम द्यायचे, असे प्रश्नचिन्ह येथील पोलीस दलासमोर आता निर्माण झाले आहे. पण शासनाचा आदेश असल्याने याची अंमलबजावणी करावी लागेल, असे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे.
नव्या विषाणूमुळे कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. याची पोलिसांना लागण होऊ नये, यासाठी गृह विभाग सतर्क झाला आहे. ५५ वर्षांवरील पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्यास आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून यांना घरातून काम करण्याची मुभा शासनाने दिली आहे. पण यांच्यासाठी वर्क फ्रॉम होम योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे अडचणीचे ठरणार आहे.
सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षाला आहे. त्यामुळे ५५ वर्षे पूर्ण झालेले बहुतांशी पोलीस सेवानिवृत्तीच्या मूडमध्ये असतात. घरातून ऑनलाइन काम करण्यासाठीचे परिपूर्ण संगणक ज्ञान त्यांच्यात नाही. यामुळे यांना घरात बसून काम करण्यासारखे कोणते काम आहे, याची माहिती प्रशासन घेत आहे. अशाप्रकारचे काम नसेल तर वर्क फ्रॉम होम केवळ कागदावरच राहणार आहे.
जिल्ह्यातील पोलिसांचे संख्याबळ
एकूण पोलीस : २९२१
अधिकारी : १५९
पोलीस : २७६२
५५ वर्षांवरील महिला पोलीस : ६
५५ वर्षांवरील पुरुष पोलीस :१६८
विभाग हायटेक; पण
पोलिसांची बहुतांशी कामे जनतेशी थेट संपर्काचीच असतात. तरीही अलीकडे पोलीस विभाग हायटेक झाल्याने काही कामे ऑनलाईन होत आहेत. सायबर कक्षातून ऑनलाइन काम केले जाते. येथे संगणक आणि तंत्रज्ञानाची माहिती असणारे पोलीस काम करतात.
या कक्षातून होणारी काही कामे घरातून करता येण्यासारखी आहेत. पण ५५ वर्षांवरील पोलिसांना ‘सायबर’मध्ये चालणारे काम करण्यासाठीचे ज्ञान नाही. हीच खरी अडचण नव्या निर्णयाच्या अंमलबजावणीवेळी येणार आहे.
कोरोनाच्या यापूर्वीच्या लाटेत ५५ वर्षांवरील पोलिसांना थेट जनतेशी संपर्क येणार नाही, असे कार्यालयीन काम दिले होते. आता सरकारने नुकतेच घेतलेल्या निर्णयानुसार वर्क फ्रॉम होम जिल्ह्यातील १७४ पोलिसांना लागू होऊ शकते. - प्रिया पाटील, उपअधीक्षक (गृह)