कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या कामाला गती देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:26 AM2021-03-17T04:26:22+5:302021-03-17T04:26:22+5:30
शिरोली : शिरोली फाटा ते सागंली रस्त्याच्या प्रलंबित कामाला लवकरच गती येणार असून, या रस्त्याच्या प्रलंबित कामाचा नवीन प्रस्ताव ...
शिरोली : शिरोली फाटा ते सागंली रस्त्याच्या प्रलंबित कामाला लवकरच गती येणार असून, या रस्त्याच्या प्रलंबित कामाचा नवीन प्रस्ताव द्या, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कोल्हापूर (शिरोली) ते सांगली चौपदरीकरण रस्त्यासंदर्भात मंगळवारी मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यमंत्री भरणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
मार्च २०१२ मध्ये शिरोली ते अंकली या ४० कि.मी. रस्त्याचे बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा, या धोरणानुसार रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आले होते. १९६.६० कोटी अंदाजपत्रक असलेला हा रस्ता ऑक्टोबर २०१४ पर्यंत पूर्ण करून रस्त्यावर टोल आकारणी करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, महसूल विभाग आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून रस्त्यासाठी लागणारी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया तसेच रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये आडवी येणारी घरे, शाळा काढण्याची प्रक्रिया रेंगाळल्यामुळे या चौपदरी रस्त्याचे काम रखडले आहे.
शिरोली-सांगली फाटा ते अंकली चौपदरीकरण मार्गाचे ५९ टक्के काम पूर्ण झाले आहे. झालेल्या कामाची सुप्रीम कंपनीने ६८० कोटींची मागणी शासनाकडे केली आहे. ४१ टक्के अपूर्ण कामाचा वाद उच्च न्यायालयात गेला आहे. नोव्हेंबर २०१७ पासून गेली तीन वर्षे या वादावर तोडगा निघत नसल्याने शासनाने या रस्त्याच्या किरकोळ दुरुस्तीसाठी २० कोटींचा निधी मंजूर केला. तरीही या रस्त्याची दुरवस्था कायम आहे. दरम्यान, मंत्रालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत कोल्हापूर-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणासंदर्भातील कामासाठी शासनाची तातडीने मान्यता घेऊन धोरण ठरवून या कामास गती द्यावी, असे राज्यमंत्री भरणे यांनी सांगितले.
या बैठकीत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे साळुंखे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक पंदरकर, अधीक्षक अभियंता एस. माने, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी व्यवस्थापक एम. के. वाठोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव प्रज्ञा वाळके उपस्थित होते.