कोल्हापूर शिवाजी पुलाचे काम बंद; ठेकेदाराचा निर्णय : उपअभियंत्यावर आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:41 AM2019-01-23T00:41:07+5:302019-01-23T00:42:56+5:30
शिवाजी पुलाच्या कामासाठी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करूनही बिलाच्या रकमेत तीनवेळा फेरफार केला. ९० लाखांचे बिल असताना फक्त नऊ लाख रुपये मंजुरीसाठी पाठविणारे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता संपत
कोल्हापूर : शिवाजी पुलाच्या कामासाठी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करूनही बिलाच्या रकमेत तीनवेळा फेरफार केला. ९० लाखांचे बिल असताना फक्त नऊ लाख रुपये मंजुरीसाठी पाठविणारे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता संपत आबदार यांच्यासारख्या मनोवृत्तीचे अधिकारी पुलावर क्षेत्रीय अधिकारी म्हणून कार्यरत असतील तर येथून पुढे पुलाचे काम आम्ही करणार नाही, असा निर्णय मंगळवारी सायंकाळी ठेकेदार आसमास कंपनीचे एन. डी. लाड यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविला.
ठेकेदार लाड म्हणाले, पर्यायी शिवाजी पुलाचे उर्वरित काम गतीने सुरू आहे. कामावरील क्षेत्रीय अधिकारी उपअभियंता संपत आबदार हे काम सुरू झाल्यापासून वादग्रस्त आहेत. पुलाच्या ‘अबेटमेंट’चा खर्च वाढला आहे. त्याची माहिती आबदार यांना आहे; त्यांनी तरीही ‘हार्ड रॉक’ (कठीण खडक) लागला नाही म्हणून निविदेवरील तरतुदीपेक्षा खोलवर खुदाई करून घेतली; त्यामुळे पुलाचे डिझाईन बदलले. त्याचा खर्चही वाढला; पण वाढीव खर्चाच्या मंजुरीची जबाबदारी उपअभियंता आबदार यांनी घेऊन ‘जनक्षोभ असल्याने काम सुरू ठेवा; वाढीव खर्चाची वरिष्ठांकडून मंजुरी घेऊ,’ असे सांगितले.
त्याची लेखी कल्पना मी मुख्य अभियंता विनय देशपांडे, कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपअभियंता आबदार यांना वेळोवेळी दिली; पण उपअभियंता आबदार यांनी खर्चाचे फेरअंदाजपत्रक करतो, असे सांगूनही ते केले नाही.
वाढीव काम होत असल्याने त्याची कल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली; पण वाढीव कामाची बिले मुंबईत कार्यालयाकडे पाठविण्याऐवजी कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांच्यातच फिरत आहे. सव्वा कोटी रुपयांचे काम झाले असताना प्रथम ६३ लाखांच्या बिलाची मंजूर घेण्यासाठी हालचाली झाल्या; त्यावेळी मी नकार दिल्याने ते बिल ९० लाख रुपयांचे काढले, ते वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले; पण पुन्हा दुरुस्तीसाठी आल्यानंतर ते उपअभियंता आबदार यांनी कमी करून फक्त नऊ लाख केले आहे.
त्याबाबत मंगळवारी बैठक आयोजित केली होती; पण आबदार यांनी त्या बैठकीस दांडी मारली. त्याची तक्रार आपण मुंबईच्या राष्टय महामार्ग कार्यालयाकडे कळविली. त्यामुळे आबदार यांच्यासारख्या मनोवृत्तीचे अधिकारी या पुलासाठी काम करत असतील तर आपण हे काम बंद ठेवणार आहोत, असा निर्णय घेतल्याचे ठेकेदार एन. डी. लाड यांनी सांगितले.
निविदा काढतानाच वाढीव तरतूद आवश्यक
उपअभियंता आबदार यांच्या काळातच नवीन निविदा काढली. त्यावेळी वाढीव कामाची तरतूद करणे आवश्यक होते. पुलाच्या कमानीतील भराव काढणे व भरणे, स्मशानभूमीपासून सेवा रस्त्याची निर्मिती, अबेटमेंटचे काम खोलवर गेल्याने ते ८० लाखांनी वाढले आहे.मुंबईत आज बैठक उपअभियंता आबदार यांच्या पराक्रमाचे किस्से मुंबईतील कार्यालयात पोहोचल्याने मुख्य अभियंता विनय देशपांडे यांनी ठेकेदार लाड, कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपअभियंता आबदार यांची बैठक आज, मंगळवारी सायंकाळी पाच वाजता मुंबईतील राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात बोलाविली आहे.