कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेचे काम ‘ट्रॅक’वर
By admin | Published: March 22, 2017 11:23 PM2017-03-22T23:23:41+5:302017-03-22T23:23:41+5:30
कामांचा शनिवारी प्रारंभ; रेल्वेमंत्र्यांची उपस्थिती
कोल्हापूर : कोल्हापूर आणि कोकणाच्या विकासाचे नवे पर्व सुरू करणाऱ्या आणि गेल्या २५ वर्षांपासून कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेल्या कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे काम आता प्रत्यक्षात ‘ट्रॅक’वर येण्याची आशा पल्लवित झाली आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील विविध कामांचा प्रारंभ शनिवारी (दि. २५) केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ‘कोल्हापूर-वैभववाडी’च्या कामाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.गेल्यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू यांनी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमागाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे १३७५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण जानेवारी २०१६ मध्ये पूर्ण झाले. शिवाय त्याचा सविस्तर अहवाल रेल्वे महामंडळाला सादर झाला. या मार्गाला अर्थसंकल्पात मान्यता मिळाली. यावर्षीच्या अर्थसंकल्पात या मार्गाच्या कामासाठी २६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आणि त्याच्या कामासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीच्या स्थापनेचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाने सरकारला सादर केला. यापुढे आता केंद्र सरकारचे पाऊल प्रत्यक्ष काम सुरू होण्याच्या दिशेने पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोल्हापुरातील श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील विविध कामांचे उद्घाटन व लोकार्पणाचा कार्यक्रम रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे प्रमुख उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमात कोल्हापूर-पुणे रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण, पुणे-मिरज-लोंढा मार्गाचे दुहेरीकरण, पुणे रेल्वेस्थानकावरील सौरऊर्जा, सांडपाणी प्रक्रिया केंद्र आणि वाय-फाय सुविधेचे लोकार्पण केले जाणार आहे. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग कामाच्या प्रारंभाबाबत कोणतीही अधिकृत सूचना नसल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभाग आणि कोल्हापूर स्थानकातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात कोकणकडून काम
कोल्हापूर-वैभववाडी, कोल्हापूर-पुणे रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाची मागणी प्रलंबित होती. त्याच्या प्रारंभामुळे कोल्हापूर आणि कोकणवासीयांना ‘अच्छे दिन’ येतील, असे मुंबई विभागीय प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी सांगितले. ते म्हणाले, कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे पहिल्या टप्प्यात कोकणकडून काम सुरू होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर स्थानकाच्या इमारतीचे ‘रिमॉडेलिंग’करणे, कोल्हापूर-मुंबई सुपरफास्ट सुरू करण्याची मागणी मंत्री प्रभू यांच्याकडे समितीतर्फे करणार आहे.
रेल्वेमार्गाचा प्रकल्प दृष्टिक्षेपात
कोल्हापूर-वैभववाडी हा सुमारे
१०७ किलोमीटर अंतराचा रेल्वेमार्ग
यासाठी एकूण ३२४४ कोटी
रुपये खर्च अपेक्षित
पहिल्या टप्प्यासाठी सुमारे
१३७५ कोटी रुपयांची तरतूद.
कोल्हापूरकरांची अनेक वर्षांपासून मागणी सत्यात उतरणार असल्याने मला खूप आनंद होत आहे. कोल्हापूर-वैभववाडी आणि पासपोर्ट केंद्राचा प्रारंभ हे माझ्या वचननाम्यात होते. त्याच्या पूर्ततेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आहे. रेल्वेमंत्री प्रभू यांनी सकारात्मकपणे साथ दिल्याने कोल्हापूर हे कोकणला जोडण्याच्या स्वप्नाला मूर्त स्वरूप येणार आहे.
- धनंजय महाडिक, खासदार
कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडल्याने व्यापार, उद्योग व पर्यटनात सुधारणा होऊन विकासाचे नवे पर्व सुरू होईल. देशभरातील भाविक करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनानिमित्त कोल्हापूरला भेट देतील. कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना गोव्याला जाता येईल. कोल्हापूर, कोकण आणि गोवा येथील अर्थकारणात मोठा बदल होईल.
- आनंद माने, माजी अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्रीज
तयारीची लगबग
रेल्वेमार्गाच्या कामाचा प्रारंभ, लोकार्पण कार्यक्रम दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी कोल्हापुरातील रेल्वे स्थानकाच्या इमारतीची रंगरंगोटी, स्वच्छता, डागडुजीचे काम, आदी स्वरूपात तयारीची लगबग वेगाने सुरू आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील अधिकाऱ्यांकडून कार्यक्रमाचे नियोजन सुरू आहे.