थेट पाइपलाइन जॅकवेलचे काम आठ दिवसांत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:24 AM2021-03-17T04:24:54+5:302021-03-17T04:24:54+5:30
कोल्हापूर : काळम्मावाडी धरणक्षेत्रात थेट पाइपलाइन योजनेच्या कामाने गती घेतली असून, येत्या आठ दिवसांत काँक्रिटीकरणासह प्रत्यक्ष जॅकवेल उभारणीच्या कामाला ...
कोल्हापूर : काळम्मावाडी धरणक्षेत्रात थेट पाइपलाइन योजनेच्या कामाने गती घेतली असून, येत्या आठ दिवसांत काँक्रिटीकरणासह प्रत्यक्ष जॅकवेल उभारणीच्या कामाला सुरुवात होईल. यावेळी धरणाची पाणीपातळी लवकर कमी झाल्यामुळे किमान अडीच ते तीन महिने कामाला मिळणार असल्याने दिवाळीपर्यंत ही योजना सुरू होऊ शकेल, असा अंदाज आहे.
या योजनेच्या धरणक्षेत्रातील कामांची प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांसह पाहणी केली. यावेळी जलअभियंता (प्रकल्प) हर्षजित घाडगे, युनिटी कन्सल्टंटचे प्रकल्प सल्लागार विजय मोहिते, जी. के.सी. कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र माळी उपस्थित होते.
बलकवडे यांनी ब्रेक प्रेशर टँकची पाहणी केली. हे काम समाधानकारक असून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सुमारे आठशे अश्वशक्तीचे उपसा पंप लावून जॅकवेलमधील पाणी काढण्यात आले आहे; परंतु त्याठिकाणी गाळ साचला असून तो त्वरित काढून घ्यावा, गाळ काढल्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या आत याठिकाणी काँक्रिटीकरणाचे काम चालू करण्याचे आदेश प्रशासकांनी दिले. जॅकवेलबरोबरच उर्वरित इन्स्पेक्शन वेल, इंटेकवेल येथील साचलेले पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
राधानगरी तालुक्यातील सोळांकूर गावच्या हद्दीतून जलवाहिनी टाकण्याच्या कामालाही गेल्या आठवड्यात सुरुवात झाली आहे. या कामाचीदेखील बलकवडे यांनी पाहणी केली. अजून नागरी वस्तीतून कामाला सुरुवात झालेली नाही. पुढील आठवड्यात तेही काम सुरू होणार आहे.
या योजनेतील इन्स्पेक्शन वेल, इंटेकवेल आणि दोन जॅकवेलची कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. गेल्या अनेक वर्षांत ही कामे करण्यासाठी अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी मिळत आहे. त्यामुळे या कालावधीत ही कामे पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जॅकवेलची कामे होताच पंप जोडले जातील आणि मगच योजना सुरू होण्याचा मार्ग मोकळा होईल. दरम्यान, जलवाहिनी टाकण्यासह जलशुद्धिकरण केंद्र, वीज कनेक्शनसाठी ट्रान्सफॉर्मर बसविणे ही कामे मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे.
फोटो क्रमांक - १६०३२०२१-कोल-काळम्मावाडी व्हीजिट
ओळ - कोल्हापूर शहराच्या काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेच्या कामांची प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांनी मंगळवारी पाहणी केली. यावेळी जलअभियंता हर्षजित घाडगे, सल्लागार विजय मोहिते, जी. के.सी. कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र माळी उपस्थित होते.