Kolhapur: गांधीनगर पाणी योजनेचे काम ठप्प, ३४३ कोटींची १३ गावांसाठी योजना

By भीमगोंड देसाई | Published: November 27, 2023 01:47 PM2023-11-27T13:47:09+5:302023-11-27T13:47:24+5:30

ठेकेदारास दंडाची कारवाई प्रस्तावित, केवळ २० टक्क काम पूर्ण

Work of Gandhinagar water scheme in Kolhapur stopped, 343 crore scheme for 13 villages | Kolhapur: गांधीनगर पाणी योजनेचे काम ठप्प, ३४३ कोटींची १३ गावांसाठी योजना

Kolhapur: गांधीनगर पाणी योजनेचे काम ठप्प, ३४३ कोटींची १३ गावांसाठी योजना

भीमगोंडा देसाई 

कोल्हापूर : तेरा गावच्या गांधीनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेच्या कामाला सध्या ब्रेक लागला आहे. तब्बल ३४३ कोटी ६८ लाख रुपयांच्या योजनेचे काम हैदराबाद येथील कंपनीकडून अपेक्षित गतीने होत नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने त्याच्यावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे. काम सुरू होऊन नोव्हेंबरअखेर एक वर्ष होत आहे. आतापर्यंत केवळ २० टक्के काम झाले आहे. तेरा गावात पाण्याच्या टाकी बांधण्यासाठी आणि पाइपलाइन बांधण्यासाठी खड्डे पडले आहेत. रहिवासी ठिकाणी खड्डे असल्याने ते धोकादायक बनले आहेत.

शासनाच्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत सन २०५४ पर्यंतच्या लोकसंख्येेला पुरेशा प्रमाणात पाणी मिळेल, अशी योजना मंजूर आहे. यासाठी माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. दरम्यान, योजनेचे काम नोव्हेंबर २०२२ पासून ठेकेदार कंपनी करीत आहे. खडीच्या गणपतीजवळ पाचगावसाठी टाकी बांधण्यासाठी मोठा खड्डा खणला आहे. मात्र, अजून येथे बांधकामही सुरू झालेले नाही. यांच्याजवळच मोरेवाडी गावासाठी पाण्याच्या टाकीचे कामही पन्नास टक्के पूर्ण होऊन थांबले आहे. 

अशाच प्रकार पाचगाव, मोरेवाडी, कळंबा अशा तेरा गावात पाण्याची टाकी, पाइपलाइनसाठी पावसाळ्यापूर्वी खोदाई करण्यात आली आहे; पण तिथे सध्या कोणतेही काम सुरू झालेले नाही. पावसाळ्यानंतर ठेकेदार कामासाठी फिरकलाच नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. अपेक्षित गतीने काम होत नसल्याने पुरेशा प्रमाणत आणि स्वच्छ पाणी मिळण्यास विलंब होणार आहे. आता अस्तित्वात असलेल्या पाणी योजनेला प्रचंड गळीत आहे. सर्व भागात समान पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते.

परिणामी, नवीन पाणी योजना शक्य तितकी लवकर पूर्ण व्हावी, यासाठी तेरा गावचे सरपंच, उपसरपंच धडपडत आहेत. ठेकेदार कंपनीकडे पाठपुरावा करीत आहेत. अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांच्या अधिकाऱ्यांना शनिवारी सरपंचांच्या शिष्टमंडळाने जाब विचारला.

दृष्टिक्षेपातील योजना

  • खर्च : ३४३ कोटी ६८ लाख ६१ हजार
  • पाण्याचा स्रोत : दूधगंगा नदी
  • प्रशासकीय मंजुरी : १७ जून २०२२
  • काम कार्यारंभ आदेश : ७ नोव्हेंबर २०२२
  • काम पूर्ण करण्याचा कालावधी : २७ महिने.


योजनेतील गावे : गांधीनगर, उचगाव, पाचगाव, उजळाईवाडी, गोकुळ शिरगाव, कणेरी, गडमुडशिंगी, सरनोबतवाडी, वळीवडे, मोरेवाडी, कंदलगाव, कळंबे तर्फ ठाणे, न्यू वाडदे.

गेले कित्येक दिवस ठेकेदार कंपनीकडून काम संथ गतीने होत आहे. सध्या अनेक ठिकाणी काम बंद आहे. तेरा गावांतील ग्रामस्थांना मुबलक, स्वच्छ पाणी मिळण्यासाठी गतीने काम करून योजना पूर्ण करावी. - संग्राम पाटील, माजी सरपंच, पाचगाव.


योजनेचे काम आतापर्यंत ४० टक्क्यांपर्यंत होणे अपेक्षित होते; पण केवळ २५ टक्के काम झाले आहे. म्हणून कंपनीवर दंडाची कारवाई प्रस्तावित केली आहे. - अमित पाथरवट, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

Web Title: Work of Gandhinagar water scheme in Kolhapur stopped, 343 crore scheme for 13 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.