कागल-सातारा सहापदरीकरण दिवाळीनंतरच, अदानी कन्स्ट्रक्शनला मिळालं काम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 02:07 PM2022-06-08T14:07:27+5:302022-06-08T14:08:04+5:30
गेले दीड वर्ष तर नुसता निविदाचाच खेळ सुरू आहे. केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयातूनच ही सर्व निविदा प्रक्रिया राबवली जाते, पण प्रत्यक्षात अशी काही चक्रे फिरतात की निविदा प्रक्रियाच रद्द केली जाते.
नसिम सनदी
कोल्हापूर : कागल-सातारा सहापदरीकरणाच्या कामाच्या मागे लागलेले निविदांचे ग्रहण काही सुटण्याचे नाव घेईना झाले आहे. दोन टप्प्यात होत असलेल्या कामासाठी दोन पॅकेजच्या निविदा मार्चमध्ये निघाल्या, त्यातील १४९१ कोटीच्या पहिल्या पॅकेजची निविदा रद्द करून फेरनिविदा ७ जुलैला निघणार आहे. १७४९.८० कोटीच्या दुसऱ्या पॅकेजी निविदा उघडली गेली आहे, अदानी कन्स्ट्रक्शनला काम मिळाले आहे, पण मंजुरीची प्रदीर्घ प्रक्रिया पाहता सहापदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला दिवाळीनंतरचाच मुहूर्त शाेधावा लागणार आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्याकागल-सातारा सहापदरीकरणाच्या कामांना मंजुरी मिळून, ३२४०.८ कोटीच्या निधीची तरतूद करुन दोन वर्षे होऊन गेले तरी प्रत्यक्षात कामास सुरुवात झालेली नाही. गेले दीड वर्ष तर नुसता निविदाचाच खेळ सुरू आहे. केंद्र सरकारच्या रस्ते विकास मंत्रालयातूनच ही सर्व निविदा प्रक्रिया राबवली जाते, पण प्रत्यक्षात अशी काही चक्रे फिरतात की निविदा प्रक्रियाच रद्द केली जाते.
गेले दीड वर्ष हेच सुरू आहे. मार्चमध्ये काढण्यात आलेल्या निविदेत पहिल्या पॅकेजसाठी आयजीएम या एकमेव कंपनीची निविदा आली होती, त्यामुळे ही प्रक्रिया जैसे थे ठेवण्यात आली. याचवेळी दुसऱ्या पॅकेजसाठी मात्र अदानी कन्स्ट्रक्शनची निविदा मंजूर होऊन त्यांची पुढील मंजुरी प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. दोन टप्प्यातील या कामाच्या या दोन तऱ्हा आणि पावसाळा सुरु असल्याचे पाहता सहापदरीकरणाचे काम नव्या वर्षापर्यंत रेंगाळणार आहे.
एपीसी धोरणानुसार होणार रस्ता
बांधा वापरा हस्तांतर या पध्दतीने रस्ते करण्याचे केंद्र सरकारचे धोरण होते, पण आता केंद्र सरकारने त्यात बदल केला आहे. एपीसी या धोरणानुसार स्वत:च राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून कागल ते सातारा सहापदरीकरणाचे काम करण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी प्रकल्प किंमत निश्चित करून त्याप्रमाणे निविदा प्रक्रिया सुरू होत आहे.
राजपत्र प्रसिध्द पण अधिग्रहण नाही
शेंद्री ते पेठ नाका येथील जमिनीचे अधिग्रहण झाले, पण त्याचवेळी पेठ नाका ते कागलपर्यंत अजून अधिग्रहण झालेले नाही. सुनावण्या, हरकती घेऊन जमिनीबाबत राजपत्र प्रसिध्द केले आहे. पण अजून मोबदला, जागेचे रेखांकन असे काहीही झालेले नाही.
- पहिले पॅकेज : १४९१ कोटी
- अंतर : ६६ किलोमीटर
- ठिकाण: कागल ते पेठ नाका
- दुसरे पॅकेज: १७४९.८० कोटी
- अंतर: ६७ किलोमीटर
- ठिकाण: पेठ नाका ते शेंद्रे नाका
- ठेकेदार : अदानी कन्स्ट्रक्शन कंपनी