कोल्हापुरातील कसबा बावडा रिंगरोडचे काम रेंगाळले, ७ वर्षांपासून भिजत घोंगडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 03:49 PM2024-01-31T15:49:16+5:302024-01-31T15:49:29+5:30
वाहतुकीची प्रचंड कोंडी
रमेश पाटील
कसबा बावडा : कसबा बावडा मुख्य रस्त्यावरील सकाळ व संध्याकाळच्या वेळी होणारी वाहतुकीची कोंडी टाळायची असेल तर खानविलकर पेट्रोलपंप ते श्रीराम पेट्रोलपंप या पाच किलोमीटर लांबीच्या पंचगंगा नदीकाठाने होणाऱ्या रिंगरोडचे काम त्वरित सुरू होणे गरजेचे आहे. तशी मागणी आता बावड्यातील नागरिकांमधून होऊ लागली आहे. मात्र, गेल्या ७ वर्षांपासून या रेंगाळलेल्या रिंगरोडची केवळ चर्चाच होत आली आहे.
बावड्यातील भगवा चौक ते पिंजार गल्ली या मार्गावर सकाळ व सायंकाळच्या वेळी वाहतुकीची कोंडी ही नित्याची झाली आहे. साखर कारखान्याच्या गळीत हंगामावेळी तर वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनतो. उसाने भरलेले ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाड्या जेव्हा या मार्गावरून जातात तेव्हा त्यांच्या पाठीमागून येणारी वाहने अक्षरशः कासव गतीने पुढे सरकत असतात. मुख्य रस्त्यावर पाण्याचा हात चौकात, तर सणावारावेळी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते.
वाहतुकीच्या कोंडीमुळे या मार्गावर लहान-मोठे अपघात तर वारंवार होत असतात. दिवसातून एकदा तरी या मार्गावर सरासरी एक-दोन अपघात झालेले पहावयास मिळतात. वाहतुकीची कोंडी होते व लहान-मोठे अपघात होतात तेव्हा बावड्याच्या रिंगरोडची चर्चा ऐरणीवर येते. या रस्त्यासाठी जमिनी जाणार असलेल्या शेतकऱ्यांना टीडीआर किंवा रोख रक्कम देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानुसार काही शेतकऱ्यांनी त्याचा मोबदलाही घेतला आहे.
असा आहे प्रस्तावित रस्ता..
जयंती नाल्याजवळील खानविलकर पेट्रोलपंप येथून या प्रस्तावित रिंगरोडला नदीकाठावरून सुरुवात होते. हा रस्ता १०० फुटी आहे. न्यू पॅलेस, शासकीय धान्य गोडाऊन, पवार मळा, राजर्षी शाहू जन्मस्थळाच्या पाठीमागून हा रस्ता पुढे जातो. बावड्यातील राजाराम बंधारा येथील दत्त मंदिरासमोरून तसेच स्मशानभूमीच्या बरोबर मधून तसेच पुढे गोळीबार मैदानातून जाऊन श्रीराम पेट्रोलपंपाजवळ मुख्य रस्त्याला मिळतो.
वाहतुकीसाठी उत्तम पर्याय..
कोल्हापूर शहरातून पुणे-मुंबई हायवेला जोडणारा शॉर्टकट रस्ता म्हणून कसबा बावडा रस्त्याची ओळख आहे. मात्र, हा रस्ता बावड्यातील अतिक्रमण व अवास्तव पार्किंग यामुळे वाहतुकीला अडचणीचा ठरतो. त्यामुळे बावड्याला रिंगरोड झाल्यास बावड्यात होणारी वाहतुकीची कोंडी टळेल आणि रिंग रोडमुळे अवजड वाहनांना वाहतुकीसाठी उत्तम पर्यायही मिळेल.
७० टक्के जमिनी ताब्यात..
कसबा बावडा रिंगरोडसाठी शेतकऱ्यांकडून आतापर्यंत ७० टक्के जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. या जमिनींच्या मोबदल्यात त्यांना टीडीआर दिला आहे. ३० टक्के शेतकऱ्यांनी अद्याप जमिनी महापालिकेच्या ताब्यात दिलेल्या नाहीत. याबाबत ८४/४ विकास नियंत्रण नियमानुसार नोटिसा पाठवल्या होत्या. पण शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे रिंगरोडचे काम ठप्प आहे. भूसंपादनाचे काम पूर्ण झाल्यावर या कामाला सुरुवात होईल. -हर्षजित घाटगे, शहर अभियंता, महानगरपालिका, कोल्हापूर