Kolhapur: भूसंपादन न करताच बालिंगा-दाजीपूर राज्य मार्गाचे काम, ग्रामस्थांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 15:42 IST2025-04-01T15:39:18+5:302025-04-01T15:42:03+5:30
शेतीचे नुकसान

संग्रहित छाया
म्हालसवडे : कोल्हापुरातून फोंडाघाटमार्गे कोकणाला जोडणाऱ्या नवीन राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. या मार्गावरील शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता खासगी कंपनीकडून काम सुरू असून अनधिकृतरीत्या शेत व पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. घानवडे (ता. करवीर) परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भूसंपादन करून मोबदला द्या, अशी मागणी केली आहे. हा रस्ता २५३ कोटींचा आहे.
बालिंगा ते दाजीपूर या नवीन राज्य महामार्गाच्या रुंदीकरणासाठी उभ्या पिकांसहित शेतजमिनी खोदण्यात येत आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे. घानवडेतील शेतकऱ्यांना बांधकाम विभागाकडून बालिंगा ते दाजीपूर जिल्हा मार्ग नोंद असून, या ठिकाणी राज्य महामार्गाची कागदपत्रे अस्तित्वात नाहीत, अशी माहिती मिळाली आहे. मात्र, खासगी कंपनीकडून अनिधिकृतरीत्या पिकांचे नुकसान करून खोदकाम सुरू असल्याचा आरोप घानवडे परिसरातील नागरिकांनी केला आहे.
निवेदनात, रुंदीकरणांमध्ये येणाऱ्या शेतीला कोणत्याही प्रकारचे सानुग्रह अनुदान अद्याप मिळालेले नाही. राज्य महामार्गाच्या रुंदीकरणात शेती देण्यास हरकती नाहीत. मात्र, भूसंपादन करून शासन नियमाप्रमाणे मोबदला मिळावा, अशी मागणी केली आहे. यावेळी करवीरचे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब देवकर, परसू पाटील, बाजीराव जाधव, कृष्णात पाटील, प्रकाश पाटील, सुनील पाटील, योगेश पाटील उपस्थित होते.
विकास कामासाठी रस्त्याच्या कामाला अडचण निर्माण करणार नाही. मात्र, रस्त्याकाठच्या शेतकऱ्यांच्या मालकी हक्काच्या व लाखमोलाच्या जमिनी रुंदीकरणामुळे जात आहेत. शासन नियमाप्रमाणे भूसंपादनाची प्रक्रिया होऊन शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, या मागणीवर आम्ही ठाम आहोत. - राजेंद्र सूर्यवंशी, माजी सभापती, पं. स. करवीर
कोणतीही पूर्वकल्पना न देता आमच्या शेतातून रस्ता करण्यात येत आहे. रस्ता करण्यास आमचा विरोध नाही. आम्हाला जमिनीचा मोबदला मिळावा. -सुनील पाटील, ग्रामस्थ, घानवडे