‘वर्क आॅर्डर’ पुलाच्या डागडुजीचीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:06 AM2018-05-15T01:06:48+5:302018-05-15T01:06:48+5:30
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाच्या संपूर्ण उर्वरित कामाबाबत सोमवारी सायंकाळी राष्टÑीय महामार्ग विभागाच्यावतीने गोवा येथील आसमास कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीस ‘वर्क आॅर्डर’ देण्यात आली. पण, पुलाचे रखडलेले काम जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यानंतरच करण्यात येणार आहे. त्यामुळे या वर्क आॅर्डरनुसार पूर्ण झालेल्या पुलाची डागडुजी करण्यात येणार आहे. सुमारे ३ कोटी ५ लाख ३५ हजार ४५५ रुपये खर्चाचे काम आहे. पुलाच्या पूर्वेकडील बाजूकडून हे काम आज, मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे. पुढील सहा महिन्यांत काम पूर्ण करण्याची अट आहे.
पर्यायी शिवाजी पुलाचे बांधकाम २०१५ पासून अर्धवट स्थितीत रखडले. पुरातत्त्व विभागाच्या कायद्यातील तरतुदीचा फटका बसून हे काम थांबले आहे. याबाबत कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने तीव्र आंदोलने केली. लोकप्रतिनिधींनीही या पुलाचे काम पूर्ण करण्याबाबत बरेच प्रयत्न केले. अखेर संतापलेल्या कृती समितीने पर्यायी पुलाचे रखडलेले काम पूर्ववत सुरू करा अन्यथा जुन्या पुलावर भिंत बांधून वाहतूक रोखण्याचा आणि जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. त्यासाठी सरकारला अल्टीमेट दिला होता. त्यानुसार गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत सोमवारी पुलाच्या कामाची राष्टÑीय रस्ते महामार्ग विभागामार्फत ‘वर्क आॅर्डर’ ठेकेदारास देण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळास दिले.
त्यानुसार सोमवारी सायंकाळी राष्टÑीय महामार्ग विभागाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अभियंता रमेश पन्हाळकर यांनी गोवा येथील मे. आसमास कन्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीस पुलाच्या उर्वरित ३,०५,३५,४५५ रुपये खर्चाच्या कामाची ‘वर्क आॅर्डर’ दिली. या कामाच्या बदल्यात कंपनीकडून ५ टक्के म्हणजेच सुमारे १५ लाख २७ हजार रुपये बँक गॅरंटी दिली आहे. संबंधित ‘वर्क आॅर्डर’ची प्रत जिल्हाधिकारी सुभेदार यांनाही देण्यात आली.
कृती समितीचे कार्यकर्ते संतप्त
शिवाजी पुलाच्या कामाची ‘वर्क आॅर्डर’ सोमवारपर्यंत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर सोमवारी सायंकाळीच सर्वपक्षीय कृती समितीचे बाबा पार्टे, सुनील पाटील, दिलीप माने, तानाजी पाटील, जयकुमार शिंदे, रमेश मोरे हे राष्टÑीय महामार्ग विभागाच्या कार्यालयात गेले. तेथे मुख्य कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे रजेवर असल्याबद्दल त्यांचा समितीने निषेध नोंदविला. ‘वर्क आॅर्डर’ दिल्यानंतर कामात अडथळा येता कामा नये, कोणी अडचण आणत असतील तर त्यांचे नाव सांगा त्याचा आम्हीच बंदोबस्त करतो, असाही इशारा कृती समितीने पन्हाळकर यांना दिला. यावेळी पन्हाळकर यांनीच ‘वर्क आॅर्र्र्डर’ची प्रत कृती समितीच्या शिष्टमंडळास दिली.
कामाचा गुंता कायम
‘वर्क आॅर्डर’ दिली असली तरी अर्धवट राहिलेल्या पुलाचे मुख्य काम सुरू करताना जिल्हाधिकाºयांची परवानगी आवश्यक असल्याचे ‘वर्क आॅर्डर’मध्ये अटच आहे. त्यामुळे पुरातत्त्व अथवा आपत्ती व्यवस्थापनांतर्गत परवानगी मिळाल्यानंतरच हे पुलाचे रेंगाळलेले वादग्रस्त काम सुरू राहणार असल्याचे स्पष्ट होते.