ंकागलला नेत्यांकडून झपाटल्यासारखे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:40 AM2017-08-15T00:40:42+5:302017-08-15T00:40:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : कै. सदाशिवराव मंडलिक कारखान्याच्या माध्यमातून तालुक्यात एक लाख झाडे दरवर्षी लावण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. तालुक्यातील आमचे सर्वच मित्र वेगवेगळे उपक्रम हाती घेत आहेत. प्रा. मंडलिक हे वृक्षारोपण मोहिमेबद्दल, संजय घाटगे गूळपावडर उत्पादनाबद्दल, तर समरजितसिंह घाटगे जलयुक्त शिवाराबद्दल, असे हे आमचे मित्र झपाटल्यासारखे काम करीत असल्याचे बघून समाधान वाटत आहे, असे उद्गार माजी जलसंपदा मंत्री आ. हसन मुश्रीफ यांनी काढले.
पिंपळगाव खुर्द (ता. कागल) येथे सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्यावतीने दहा हजार वृक्षांचे रोपण करण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ सोमवारी करण्यात आला. त्यावेळी आमदार मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक होते. यावेळी गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा हॉल आमदार फंडातून बांधण्याचा प्रारंभ करण्यात आला. तसेच नैसर्गिक शेती अभियानाचे एम. आर. चौगुले गुरुजी यांच्या ७८व्या वाढदिवसानिमित्त दोन्ही नेत्यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला.
आमदार मुश्रीफ म्हणाले, पाऊस गायब झाला आहे. पिके हातातून जातात की काय अशी परिस्थिती झाली आहे. नदीमध्ये आणि कॅनॉलमध्ये पाणी सोडण्याबद्दल अधिकाºयांना बोललो आहे.
प्रा. संजय मंडलिक म्हणाले, एका व्यक्तीमागे पंचवीस झाडे अशी संख्या हवी, अन्यथा येत्या काही वर्षांत आपल्या भागाचेही तापमान ५० अंशांवर जाईल. कै. मंडलिक यांच्या विचारानेच कारखाना चालविला जात आहे. त्यामुळेच दरवर्षी एक लाख झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आनंदी आकुर्डे यांनी स्वागत केले. एम. आर. चौगुेले, अशोकराव नवाळे यांची भाषणे झाली. तहसीलदार किशोर घाडगे, सभापती कमल पाटील, उपसभापती रमेश तोडकर, बडोपंत चौगुले, भय्या माने, शहाजी पाटील, चित्रगुप्त प्रभावळकर, संजय चित्तारी, कैलास जाधव, दत्ता पाटील-केनवडेकर, आदी उपस्थित होते. सुजाता मोरे यांनी सूत्रसंचालन केले. महेश चौगुले यांनी आभार मानले.
राजकीय प्रदूषणही दूर करूया : मंडलिक
प्रा. मंडलिक म्हणाले, वृक्षारोपणाने जसे हवेतील प्रदूषण दूर होते, तसे आता तालुक्यातील राजकीय प्रदूषणही दूर करण्याचे प्रयत्न करूया. माझ्या तसेच संजयबाबा, समरजितसिंह यांच्या उपक्रमांना पाठिंबा व्यक्त करून आमदार मुश्रीफ यांनी लोकप्रतिनिधींचे कर्तव्य निभावले आहे. ते केवळ मते देणाºयांचेच आमदार नाहीत, तर मते न दिलेल्यांचेही आमदार आहेत.