पुणे विद्यापीठातच काम करणार
By admin | Published: February 10, 2015 12:23 AM2015-02-10T00:23:42+5:302015-02-10T00:29:36+5:30
पवार : अन्य विद्यापीठांमध्ये कुलगुरूपदी कार्यरत होण्याच्या चर्चेला पूर्णविराम
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील कार्यकाल संपल्यानंतर पुणे विद्यापीठातील माझ्या भूगर्भशास्त्र विभागात पुन्हा प्राध्यापक म्हणून काम करणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी सोमवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शिवाय राज्यातील अन्य विद्यापीठांमध्ये कुलगुरू म्हणून कार्यरत राहण्याबाबत शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पस्मध्ये सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला.कुलगुरू डॉ. पवार यांचा विद्यापीठातील कार्यकाल २५ फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्याबाबतची माहिती त्यांनी गेल्या तीन महिन्यांपूर्वी कुलपती कार्यालयाला पत्राद्वारे कळविली आहे. त्यानुसार कुलगुरू निवडीची प्रक्रिया कुलपती कार्यालयाकडून सुरू झाली आहे. मात्र, ही प्रक्रिया संथपणे सुरू आहे. डॉ. पवार यांचा कार्यकाल संपण्यासाठी अवधी बाकी असतानाच विद्यापीठाच्या कॅम्पस्सह संलग्नित महाविद्यालयांच्या वर्तुळात ते केंद्रीय विद्यापीठ, मुंबई, पुणे विद्यापीठात कुलगुरू अथवा भूगर्भशास्त्राशी संबंधित राष्ट्रीय संशोधन संस्थेत संचालकपदी कार्यरत राहणार अशा चर्चा रंगल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर डॉ. पवार म्हणाले, पाच वर्षांपूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर येथील संशोधनाला चालना देणे आणि ‘नॅक’चे अव्वल मानांकन मिळविणे ही ध्येय बाळगली. सर्वांच्या सहकार्याने ती साध्यदेखील केली. विद्यापीठातील माझा कुलगुरूपदाचा कार्यभार दोन आठवड्यांनी संपणार आहे. अन्य संस्थेमध्ये कुलगुरू अथवा संचालक म्हणून काम करण्याचा निर्णय मी अजून घेतलेला नाही. भूगर्भशास्त्रात संशोधन करण्याचे मी ठरविले आहे. त्यानुसार या महिन्याच्या अखेरीस अथवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुणे विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागात रूजू होईन. त्यानंतर चांगली संधी मिळाल्यास अन्य पर्यायांचा विचार करणार आहे. (प्रतिनिधी)
अन्य लाभांसाठी मूळ पदावर येणे गरजेचे...
विद्यापीठ, महाविद्यालय पातळीवर मूळ पद कायम ठेवून ठरावीक कालावधीसाठी एखाद्या शैक्षणिक संस्थेत प्रशासनातील पदावर काम करण्याच्या प्रक्रिया म्हणजे ‘लीन’. त्यानुसार डॉ. पवार हे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कार्यरत राहिले.
संबंधित पदाची मुदत संपल्यानंतर मूळ पदावर रूजू होणे आवश्यक असते. त्यामुळे निवृत्तिवेतन आदी लाभ मिळविण्याची प्रक्रिया सुरळीत होते.
विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे हे आपला कार्यकाल संपण्यापूर्वी केंद्रीय विद्यापीठ राजस्थानमध्ये रूजू झाले.
मूळ पदावर रूजू होण्यापूर्वीच ते याठिकाणी गेल्याने त्यांना निवृत्तिवेतन तसेच अन्य लाभांबाबत अडचणी निर्माण झाल्या. हे लक्षात घेवून डॉ. पवार यांनी पहिल्यांदा मूळ पदावर रूजू होण्याचे ठरविले असल्याचे समजते.