राजापूरचे राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम रखडले

By admin | Published: October 7, 2015 11:56 PM2015-10-07T23:56:33+5:302015-10-07T23:56:33+5:30

ग्रामस्थांचे शुद्ध पाण्याविना हाल : निकृष्ट व अपूर्ण काम असल्याने ग्रामपंचायतीचा ताब्यात घेण्यास नकार

Work of Rajapur National Drinking Water Scheme | राजापूरचे राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम रखडले

राजापूरचे राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम रखडले

Next

गणपती कोळी -- कुरूंदवाड--राजापूर (ता. शिरोळ) येथील राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम गेल्या तीन वर्षांपासून अंतिम टप्प्यात रखडले आहे. योजनेचे काम निकृष्ट व अपूर्ण असल्याने ग्रामपंचायतीने योजना ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नदी उशाला असूनही ग्रामस्थांचे शुद्ध पाण्याविना हाल होत आहेत. या योजनेची चौकशी होऊन ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामपंचायतीने पत्राद्वारे केली आहे.कृष्णा नदीकाठावर छोट्या लोकवस्तीचे शिरोळ तालुक्यातील हे गाव आहे. ग्रामस्थांना पिण्यासाठी शुद्ध व मुबलक पाणी मिळावे, यासाठी ग्रामपंचायतीने राष्ट्रीय पेयजल योजना राबविली. सुमारे ८२ लाख रुपये खर्चाची योजना २०११-१२ साली मंजूर होऊन ठेकेदाराकडून कामही चालू झाले. मात्र, तीन वर्षे झाली तरी अद्याप योजना पूर्णत्वास नाही.नदीपासून मुख्य जलवाहिनी, अंतर्गत पाईपलाईन, पाण्याची टाकी, फिल्टर असे ९० टक्केकाम पूर्ण झाले आहे. मात्र, अंतर्गत पाईपलाईन अवघ्या एक फूट खोलीवर जमिनीत घातल्याने वाहतुकीच्या वर्दळीने योजना चालू होण्यापूर्वी पाईपलाईन चेपली आहे. पाण्याची मुख्य टाकी, साठवणीच्या टाकीला गळती लागली आहे. ठेकेदाराच्या कामाच्या निकृष्टतेबद्दल वारंवार तक्रार करूनही ठेकेदाराने दखल घेतली नाही. त्यातच २०१४ मध्ये ग्रामपंचायतीची सत्ता बदलल्याने योजनेच्या निकृष्ट कामामुळे ग्रामपंचायतीच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी योजना ताब्यात घेतली नाही.
परिणामी, ग्रामपंचायतीच्या जुन्या नळ पाणीपुरवठ्याद्वारे अपुरा व अशुद्ध पाणीपुरवठा होत असून, शासनाचे लाखो रुपये खर्ची घालून ठेकेदाराच्या चुकीमुळे ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत ठेकेदारावर कारवाईचा ठराव करण्यात आला आहे. तर ग्रामपंचायतीनेही निकृष्ट कामाची चौकशी होऊन ठेकेदारावर योग्य ती कारवाई होण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे केली आहे. त्यामुळे वादाच्या भोवऱ्यात येथील योजना सापडली असून, नदी उशाला असूनही ग्रामस्थांचे शुद्ध पाण्याविना हाल होत आहेत.


या योाजनेच्या निकृष्ट कामाबद्दल ठेकेदाराबरोबरच शिरोळ पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे शिरोळच्या गटविकास अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन पाहणी केली आहे, व कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. ग्रामसभा व ग्रामपंचायत सभेमध्ये ठेकेदाराला उपस्थित राहण्यास सांगूनही उपस्थित राहत नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांचे शुद्ध पाण्याविना होणारे हाल याला ठेकेदारच जबाबदार असून, जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे. प्रसंगी न्यायालयातही जाण्याची आमची तयारी आहे.
- सतीश आवटी, राजापूर उपसरपंच.

Web Title: Work of Rajapur National Drinking Water Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.