रंकाळा रस्त्याचे काम सुरू
By admin | Published: May 29, 2016 01:02 AM2016-05-29T01:02:30+5:302016-05-29T01:02:30+5:30
आंदोलनाच्या धास्तीचा परिणाम : महापालिकेचे अधिकारी खडबडून जागे
कोल्हापूर : फुलेवाडी ते रंकाळा स्टॅँड मार्गावरील रंकाळा तलावासमोरील गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याचे काम शनिवारी महापालिकेने सुरू केले. ‘भाजप’च्या आंदोलनाचा धसका घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रारंभ करण्याचा नारळ फोडला. तरीही अक्षम्य दिरंगाईच्या निषेधार्थ ठरल्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आंदोलन करीत निषेध नोंदविला.
रंकाळा तलाव येथे गेल्या पाच वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत असणारा रस्ता तातडीने पूर्ण होण्यासाठी भाजपतर्फे अनेकवेळा आंदोलने केली आहेत. फुलेवाडी जकात नाका ते रंकाळा स्टॅँड हा रस्ता आय.आर.बी.कंपनीकडून करण्यात येणार होता; परंतु जनरेट्यामुळे राज्य शासनाने या प्रकल्पाची किंमत त्यांना देण्याचे मान्य करून हा प्रश्न निकाली काढला; परंतु त्यानंतर हा साधारण ५०० मीटरचा रस्ता तयार करण्याची जबाबदारी महापालिकेवर होती; परंतु ती त्यांनी पार पाडली नाही. त्यामुळे या ठिकाणी अनेक अपघात घडून, वाहनांच्या वर्दळीने धूळ उडून प्रदूषणाचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याच्या निषेधार्थ भाजपने शनिवारी आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्यानुसार शुक्रवारी पक्षातर्फे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना आंदोलनाची माहिती देण्यात आली. या आंदोलनाची धास्ती घेऊन शनिवारी सकाळी ९ वाजताच या रस्त्यावर खडी, मुरूम टाकून कामाचा शुभारंभ महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला. तरीही पक्षाने ठरल्याप्रमाणे या ठिकाणी आंदोलन करून अक्षम्य दिरंगाईचा निषेध नोंदविला. महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी रस्त्याचे काम आठ दिवसांत पूर्ण झाले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यांना अभियंता एस. के.
पाटील यांनी येत्या तीन दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष अमोल पालोजी, सरचिटणीस विजय जाधव, माजी अध्यक्ष महेश जाधव, सुभाष रामुगडे, हेमंत आराध्ये, मारुती भागोजी, संजय सावंत, श्रीकांत घुंटे, राजू मोरे, विजय आगरवाल, विवेक कुलकर्णी, मधुमती पावणगडकर, अॅड. अमिता कुलकर्णी, सुनीता सूर्यवंशी, शारदा पाटील, पारस पालिचा, रवींद्र घाटगे, आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)