कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याचे काम सुरू
By admin | Published: January 8, 2015 10:57 PM2015-01-08T22:57:13+5:302015-01-09T00:01:06+5:30
-लोकमतचा प्रभाव -बाजूपट्ट्यांची कामे : रस्ता रुंदीकरणाबरोबर मजबुतीकरण
कोपार्डे : गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याच्या प्राथमिक टप्प्याचे काम जोमात सुरू असून, शिंगणापूर फाटा ते कळे दरम्यानच्या १८ कि.मी. रस्त्याचे रूंदीकरण, मजबुतीकरण व बाजू पट्ट्यांचे काम सुरू आहे.
कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधींचा खर्च झाला आहे. मात्र, प्रचंड पाऊस त्याचबरोबर या मार्गावर असणारी प्रवासी, मालवाहतुकीबरोबर दुचाकी वाहने, पाच साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतूक करणारी वाहने यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्यावर असणाऱ्या वाहतुकीचा प्रचंड ताण पाहता या रस्त्याचे रूंदीकरण होणे ही गरज आहे. मात्र, प्रशासकीय व राजकीय पातळीवरील अनास्था यामुळे कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली आहे.
याबाबत ‘लोकमत’मध्ये प्रकाशझोत टाकत कोल्हापूर- गगनबावडा रस्त्याची व्यथा व त्याबाबत असणारी जनतेची अपेक्षा मांडली होती. याचा परिणाम शासन, लोकप्रतिनिधी यांनी जबाबदारी स्वीकारून त्याबाबत लक्ष घालून मंजूर व वाढीव निधीबाबत प्रयत्न केले. सध्या आठ दिवस झाले या रस्त्याच्या रूंदीकरणाचे प्राथमिक काम एका बाजूने सुरू असून, सध्या कोपार्डे ते वाकरे (ता. करवीर) येथील कामाला गती देण्यात आली आहे.त्यापैकी शिंगणापूर फाटा ते कळेपर्यंतच्या प्राथमिक टप्प्यातील रस्त्याचे रूंदीकरण, मजबुतीकरण व बाजू पट्ट्यांची कामे सुरू आहेत. याबाबत ‘लोकमत’चे कौतुक होत आहे. (वार्ताहर)