सयाजीराव गायकवाड यांचे कार्य दुर्लक्षित

By admin | Published: January 12, 2017 01:17 AM2017-01-12T01:17:10+5:302017-01-12T01:17:10+5:30

बाबा भांड : देशातील इतिहासकारांकडून बडोदा नरेशांवर अन्याय झाल्याची व्यक्त केली खंत

The work of Sayajirao Gaikwad neglected | सयाजीराव गायकवाड यांचे कार्य दुर्लक्षित

सयाजीराव गायकवाड यांचे कार्य दुर्लक्षित

Next

कोल्हापूर : साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, प्रशासन, सामाजिक सुधारणेला प्राधान्य देत स्वातंत्र्यलढ्याला बळ देणाऱ्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे कार्य इतिहासकारांकडून दुर्लक्षिले गेले, अशी खंत ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांनी व्यक्त केले.
येथील करवीरनगर वाचन मंदिरातर्फे आयोजित ज्येष्ठ साहित्यिक, ज्ञानपीठ पुरस्काराचे मराठीतील प्रथम मानकरी ‘पद्मभूषण’ कै. वि. स. तथा भाऊसाहेब खांडेकर स्मृती व्याख्यानमालेत ते ‘सयाजीराव गायकवाड महाराज (बडोदा) आणि राजर्षी शाहू छत्रपती’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी राजाभाऊ जोशी होते. महापौर हसिना फरास यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने व्याख्यानमालेस प्रारंभ झाला.
भांड म्हणाले, शिक्षण हा एकमेव परिवर्तन व प्रगतीचा मार्ग आहे हे ओळखून सयाजीराव गायकवाड यांनी सन १८९२मध्ये सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण सुरू केले. शिक्षण, उद्योग व विज्ञानाची कास ही विकासाची मुख्य साधने आहेत याची जाण असलेल्या गायकवाड यांनी लेखन, वाचन, ग्रंथालयाची साखळी सुरू केली. स्वातंत्र्यपूर्व काळात प्रत्येक गावात ग्रामपंचायती स्थापन केल्या. या काळात ७५ हजारांहून अधिक कायदे त्यांनी केले. पंगती भेद दूर करण्यासाठी सर्व लोकांत ते मिसळत असत. महाराष्ट्रातील सर्व धर्म, जातीच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली. बहुजनांची माणसे शिकली पाहिजेत यासाठी समाजशिक्षणाचे मोठे कार्य त्यांनी सुरू केले. सहकाराचे महत्त्व त्या काळी त्यांनी ओळखले व आशिया खंडातील पहिली सहकारी पेढी व साखर कारखाना सुरू केला. स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांना मदत केली. अशा सामाजिक कार्याबरोबरच ८१७ ग्रंथांच्या प्रकाशनासाठी त्यांनी मदत केली. जनकल्याणासाठी झटणारा हा विचारवंत राजा आणि राजर्षी शाहू महाराज यांचे कार्यकर्तृत्व अफाट आहे. दोन्ही राजांनीही समाजक्रांती घडवून आणली; परंतु बडोदा संस्थान गुजरातमध्ये गेल्याने असेल वा इतिहास दुर्लक्षित राहिल्याने असेल गायकवाड यांचे कार्य शाहू, फुले, आंबेडकर यांच्या रांगेत घेतले गेले नाही हे दुर्दैव.
ग्रंथपाल मनीषा शेणई यांनी सूत्रसंचालन केले. कार्यवाह सतीश कुलकर्णी यांनी स्वागत केले. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रमेश जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. उदय सांगवडेकर यांनी आभार मानले.

Web Title: The work of Sayajirao Gaikwad neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.