चिकोत्रा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:14 AM2021-03-30T04:14:01+5:302021-03-30T04:14:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सेनापती कापशी : चिकोत्रा खोऱ्यातील कागल, भुदरगड व आजरा तालुक्यातील सुमारे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनापती कापशी : चिकोत्रा खोऱ्यातील कागल, भुदरगड व आजरा तालुक्यातील सुमारे तीस गावांंसाठी वरदान ठरणारे चिकोत्रा धरण कमी पाऊस झाला तरी पूर्ण क्षमतेने भरावे यासाठी राजे फौंडेशनच्या माध्यमातून आरळगुंडी पठारावर आणखी दोन बंधारे बांधण्यात येणार आहेत. चरीद्वारे हे पाणी चिकोत्रा धरणामध्ये वळविणार आहोत, अशी माहिती शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी दिली.
आरळगुंडी पठारावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष बांधण्यात येणाऱ्या बंधारा साईटची पाहणी घाटगे यांनी केली. यावेळी ते बोलत होते.
मागील वर्षी एक बंधारा बांधून पूर्ण केला. याचा फायदा चिकोत्रा धरण शंभर टक्के भरण्यासाठी झाला. उर्वरित दोन चर खोदण्याचे व त्या बंधाऱ्याच्या बाजूलाच दुसरा बंधारा बांधण्याचे आम्ही नियोजन केले आहे. या उन्हाळ्यात हे काम झाले तर कमीत कमी पाऊस झाला तरी चिकोत्रा धरण दरवर्षी शंभर टक्के भरेल. त्यामुळे चिकोत्रा परिसराचा हा शास्वत प्रश्न कायमचा सुटेल, त्यासाठीच हा आमचा प्रयत्न आहे. उमेश देसाई म्हणाले, कमी पाऊस झाला तरी भविष्यात हे धरण दरवर्षी शंभर टक्के भरेल व याचा फायदा वन विभागासही होईल. या साईटची पाहणी करण्यासाठी समरजित घाटगे यांनी येथे भेट दिली आहे. त्यासाठी सर्व घटकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे.
यावेळी राजाभाऊ माळी, संजय बरकाळे ,सागर मोहिते, दिलीप तिप्पे, वनविभागाचे वनक्षेत्रपाल के. एस. आहेर, वनपाल के. एच. पाटील, वनरक्षक किरण पाटील, वर्षा तोरसे, प्रियांका एरुडकर, दत्तात्रय जाधव उपस्थित होते.
फोटो :- आरळगुंडी (ता. भुदरगड) येथील पठारावर चिकोत्रा धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी बांधावयाच्या बंधाऱ्यांसाठीची पाहणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत करताना शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे व उमेश देसाई.