शाहू समाधीस्थळाचे कामही निधी अभावी रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:25 AM2021-05-06T04:25:00+5:302021-05-06T04:25:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सिद्धार्थ नगर येथील समाधीस्थळाचे दुसऱ्या टप्प्यातील काम ८ कोटींच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सिद्धार्थ नगर येथील समाधीस्थळाचे दुसऱ्या टप्प्यातील काम ८ कोटींच्या निधी अभावी रखडले आहे. आज गुरुवारपासून शाहूंच्या स्मृती शताब्दी वर्षास प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर किमान या वर्षभरात तरी महापालिका, मंत्री, लोकप्रतिनिधींनी समाधीस्थळाचे काम पूर्णत्वास न्यावे अशी शाहूप्रेमींची इच्छा आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे १९२२ साली मुंबईतील पन्हाळा लॉज येथे निधन झाले. तत्पूर्वी त्यांनी आपल्या निधनानंतर नर्सरी बागेत समाधी बांधण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली होती. महाराजांच्या निधनानंतर तब्बल ९७ वर्ष झाले तरी त्यांची ही इच्छा कोल्हापूरकर पूर्ण करु शकले नव्हते. अखेर इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, वसंतराव मुळीक, अमित आडसुळे यांच्यासह शाहूप्रेमींनी महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला, महापालिकेशी पत्रव्यवहार झाला या प्रयत्नाला यश आले. पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला, महापालिकेच्या वतीने नर्सरी बागेतील जागा दिली, स्वत: तीन कोटींचा निधी खर्च करुन समाधीस्थळ विकासाचा पहिला टप्पा पूर्ण केला.
काम सुरू झाल्यापासून पुढे तीन वर्षांनी या पहिल्या टप्प्यात मेघडंबरी, स्थळातील शाहू महाराजांचे मुख्य शिल्प, कंपाऊंड, परिसरातील लॅण्डस्केपिंग अशी विकासकामे केली गेली. अखेर शाहू महाराजांची इच्छा १९ जानेवारी २०२० रोजी पूर्ण होऊन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या हस्ते समाधीस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी व त्यानंतरही समाधी स्थळाला भेट देण्यासाठी आलेले मंत्री एकनाथ शिंदे, विश्वजित कदम अशा अनेक नेत्यांनी दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली होती.
महापालिकेने दुसऱ्या टप्प्यासाठी ८ कोटींचा आराखडा तयार करुन तो ६ फेब्रुवारी २०२० रोजी समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांना सादर केला. सामाजिक न्याय विभागाच्या विशेष प्रकल्पाकडून हा निधी मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. फेब्रुवारीमध्ये हा प्रस्ताव शासनाकडे गेला आणि मार्च महिन्यापासून कोरोना संसर्ग, लॉकडाऊन सुरू झाला. त्यामुळे सगळ्याच विकासकामांना खो बसला. गेल्या सव्वा वर्षांपासून याबाबत पाठपुरावा देखील करण्यात आलेला नाही.
सध्याची परिस्थितीही गंभीर असली तरी आज गुरुवारपासून शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षभरात तरी उर्वरित विकासकामांचा दुसरा टप्पा पूर्ण केला जावा, त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा अशी शाहूप्रेमींची मागणी आहे.
--
दुसऱ्या टप्प्यातील विकासकामे
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉलचे नूतनीकरण
-प्रिन्स शिवाजी गार्डनचे सुशोभीकरण
-परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज, ताराराणी मंदिर व समाधी मंदिरांचा जीर्णाेद्धार
-कलादालन
-विद्युत व्यवस्था,पार्किंग.
----
शाहू समाधीस्थळाचा पहिला टप्पा पूर्ण होऊन सव्वावर्ष झाले तरी दुसऱ्या टप्प्यासाठी समाजकल्याण कडून निधी मिळालेला नाही. सध्या परिस्थिती वेगळी असली तरी यंदा शाहू स्मृती शताब्दी वर्ष सुरू होत असल्याने विशेष बाब म्हणून समाधी स्थळाचे काम या वर्षात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
इंद्रजित सावंत
इतिहास संशोधक
--
फोटो फाईल स्वतंत्र पाठवत आहे.