वेतन कपातीच्या पावत्या न दिल्यास काम बंद-अंशदायी कर्मचाऱ्यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:02 AM2019-05-07T00:02:53+5:302019-05-07T00:03:38+5:30
जिल्हा परिषदेकडील १ नोव्हेंबर २0१५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात झालेल्या अंशदायी पेन्शन योजनेच्या रकमेच्या अनेक वर्षांच्या पावत्या कर्मचाºयांना मिळालेल्या नाहीत.
कोल्हापूर : जिल्हा परिषदेकडील १ नोव्हेंबर २0१५ नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात झालेल्या अंशदायी पेन्शन योजनेच्या रकमेच्या अनेक वर्षांच्या पावत्या कर्मचाºयांना मिळालेल्या नाहीत. याबाबत १२ मेपर्यंत कार्यवाही न झाल्यास १३ पासून बेमुदत काम बंद करण्याचा इशारा कर्मचाºयांनी दिला.
विविध संघटनांच्या पदाधिकारी व कर्मचाºयांनी सोमवारी दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना निवेदन दिले. या पावत्या मिळाव्यात यासाठी निवेदने दिली तरीही पावत्या न मिळाल्याने कर्मचारी आक्रमक झाले. याला कारणीभूत अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
जुलै २0१६ पासून याबाबत पाठपुरावा करीत आहेत. नेमके किती पैसे जमा झाले आहेत, याचा हिशेब कर्मचाºयांकडे नाही. अनेक कर्मचारी मयत झाले आहेत. त्यांच्या वारसांना या प्रकरणातील रक्कम मिळालेली नाही. १0 वर्षांनंतर यातील रक्कम काढता येत असताना केवळ हिशेब पूर्ण नसल्याने पैसे काढता येत नाहीत.
मुदतवाढ देऊन कर्मचारी संघटनांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे; परंतु वित्त विभागाकडून टाळाटाळ सुरू आहे. २0१६ अखेरच्या काही पावत्यांचे वाटप केले; मात्र या पावत्या सदोष असल्याचा आरोप केला. मित्तल यांनी नंतर घेतलेल्या बैठकीत ३१ मेपर्यंत मुदत देण्याचा निर्णय घेतला; मात्र लेखी देण्याचा आग्रह कर्मचाºयांनी धरला. चर्चेत मुख्य लेखा अधिकारी संजय राजमाने, राकेश कदम, सचिन जाधव, स्वप्निल घस्ते, नीलेश म्हाळुंगेकर, अश्विन दारवाडकर, दीपक साठे, किरण निकम, हंकारे, आदींनी भाग घेतला.
धनादेश मुदतबाह्य
कर्मचाºयांच्या वेतनातून वजावट झालेल्या रकमेचे डीडी तालुक्यातून किंवा संबंधित विभागप्रमुखाकडून वित्त विभागाला प्राप्त होतात; परंतु संबंधित कर्मचाºयांच्या खात्यावर ते वेळेवर जमा केले जात नाहीत. ही बाब २0१६ मध्ये निदर्शनास आली होती.
त्यावेळी सुमारे दोन कोटी रुपयांचे धनादेश मुदतबाह्य झाले होते. ही मुदत वाढवून घेण्यात आली; मात्र त्यातील काही धनादेश गहाळ झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आचारसंहितेमुळे बदल्यांचा कार्यक्रम स्थगित : आडसूळ
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने ७ आणि ८ मे रोजी जाहीर केलेला बदल्यांचा कार्यक्रम स्थगित केला. लोकसभेची आचारसंहिता अधिकृतपणे संपली नसल्याने ही प्रक्रिया थांबविल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी सांगितले. ‘लोकमत’ने ५ मे च्या अंकामध्ये ही बदली प्रक्रिया पुढे जाण्याची शक्यता वर्तवली होती.
सामान्य प्रशासन विभागाने आज, मंगळवारी व उद्या, बुधवारी बदल्यांचा कार्यक्रम जाहीर केला होता. समिती सभागृहात दोन्ही दिवशी समुपदेशन करून बदल्या करण्यात येणार होत्या. यासाठी सामान्य प्रशासनने बदलीस पात्र कर्मचाºयांची माहिती मागवून घेतली होती. मात्र, आचारसंहिता सुरू असेपर्यंत बदल्यांची प्रक्रिया राबविता येणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी हा निर्णय घेतल्यानंतर गटविकास अधिकारी व विभाग प्रमुखांना याबाबत माहिती दिली. आचारसंहिता संपल्यानंतर बदल्यांच्या समुपदेशनाचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले.
रविवारी तयारी पूर्ण
‘सामान्य प्रशासन’चे अधीक्षक संजय अवघडे व सहकाºयांनी रविवारी सकाळी साडेदहा ते रात्री नऊपर्यंत कार्यालयात थांबून बदल्यांबाबतची पूर्वतयारी पूर्ण केली होती.
जिल्हा परिषदेत सोमवारी वेतनातून कपातीच्या पावत्या मिळाव्यात म्हणून कर्मचाºयांनी अमन मित्तल यांना भेटण्यासाठी गर्दी केली होती.