नगर भूमापनमध्ये काम ऑनलाईन, मलिदा ऑफलाईन, मिळकतधारकांचे होतात हेलपाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2021 02:23 PM2021-12-31T14:23:38+5:302021-12-31T14:25:20+5:30
भीमगोंडा देसाई कोल्हापूर : येथील नगर भूमापन कार्यालयातील (सीटी सर्व्हे) कामकाज ऑनलाईन आणि मलिदा ऑफलाईन गोळा केला जात आहे, ...
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : येथील नगर भूमापन कार्यालयातील (सीटी सर्व्हे) कामकाज ऑनलाईन आणि मलिदा ऑफलाईन गोळा केला जात आहे, अशा सार्वत्रिक तक्रारी आहेत. मलिदा गोळा करून साहेबांपर्यंत पोहोच करण्यासाठी दलालांच्या टोळ्या तयार झाल्याचाही आरोपही होत आहे. मिळकतधारकांना हेलपाटे मारायला लावून पैसे देण्याची मानसिकता तयार केली जात आहे. कार्यालयातील दिरंगाई कामकाज संतापजनक असल्याचेही अनेक मिळकतधारकांचे म्हणणे आहे.
शहरातील मिळकतींची मोजणी करणे, हक्कसोड पत्र, बक्षीसपत्र, वारस नोंद करणे, मिळकतपत्रक, नकाशा देणे, बँकेचा बोजा नोंद करणे, कमी करणे, मिळकत पत्रकातील दुरूस्ती करणे, पोट हिश्श्यावरून वाद निर्माण झाल्यास निवाडा करणे, नवीन मालमत्ता खरेदी केल्यानंतर नाव लावणे आदी कामे नगर भूमापन कार्यालयातून होतात. यातील बहुतांशी कामे ऑनलाईन केली जात आहेत. पण अर्ज कार्यालयातील टपाल विभागात दिल्यानंतर वेळेत निर्गत होत नाही.
परिणामी मिळकतधारक कार्यालयात हेलपाटे मारतो. संबंधित टेबलकडे चौकशी करतो. त्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही. काम कधी होईल, यासंबंधी ठोस आश्वासन मिळत नाही. यामुळे त्याला नाईलाजास्तव दलाल शोधून पैसे देऊन काम करून घ्यावे लागते. रोज अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी रांग लागलेली असते. बंद दरवाजाआडच्या कक्षात बसलेल्या नगर भूमापन अधिकाऱ्याला भेटून काम करून घेण्यासाठी झुंबड उडालेली असते.
खाली लाच, वर प्रतिबंध
पहिल्या मजल्यावर नगर भूमापन आणि दुसऱ्या मजल्यावर लाचलुचपत प्रतिबंधकचे कार्यालय आहे. तरीही नगर भूमापन कार्यालयातील खाबूगिरीच्या तक्रारी आहेत. यामुळे ‘खाली लाच आणि वर प्रतिबंध’, असे तेथील चित्र आहे. लाचलुचपत प्रतिबंधकच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात जाता-जाता नगर भूमापनमधील अर्थपूर्ण वाटाघाटीचा कानोसा घ्यावा आणि मलिदा गोळा करणाऱ्यांवर जरब बसवावी, अशी मागणी होत आहे.
वॉर्डसाहेबांना पैसे दिलेत
नगर भूमापन कार्यालयातील काम करून घेण्यासाठी २० ते ३० फेऱ्या माराव्या लागतात. कामासाठी वॉर्डसाहेबांना ५००० रुपये दिले आहेत. तरीही तो काम करीत नाही, अशा आशयाचे निनावी पत्र ‘लोकमत’सह पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस निरीक्षक आदींकडे पाठविले आहे. पत्रात तक्रारदाराचे नाव नसल्याने या प्रकरणाची चौकशी करून दोषींपर्यंत पोहोचण्यात अडचण असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
कार्यालयातील कामकाज ऑनलाईन केले आहे. यामुळे दलालांकडे जाण्याची आवश्यकता नाही. अडचण असल्यास थेट पाठपुरावा करावा. - किरण माने, नगर भूमापन अधिकारी
समोरच्याचे काम कोणते आहे, किती वेळात त्याला काम करून हवे आहे, यावरून पैसे उकळले जातात. पैसे गोळा करण्यासाठी दलालांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. - सचिन जाधव, शहर अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष