वडणगेच्या तलावाचे काम राजकीय गाळात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:28 AM2021-08-14T04:28:42+5:302021-08-14T04:28:42+5:30

कोल्हापूर करवीर तालुक्यातील मोठे गाव असलेल्या २८ एकरांतील वडणगे गावतलावाचे काम राजकीय गाळात अडकल्याचे ...

The work of Wadange Lake is in the political arena | वडणगेच्या तलावाचे काम राजकीय गाळात

वडणगेच्या तलावाचे काम राजकीय गाळात

Next

कोल्हापूर करवीर तालुक्यातील मोठे गाव असलेल्या २८ एकरांतील वडणगे गावतलावाचे काम राजकीय गाळात अडकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ३ कोटी १६ लाख रुपयांच्या या प्रकल्पाचे तीन वर्षे झाली तरी २० टक्केदेखील काम झालेले नाही. केवळ कागदोपत्री खेळ सुरू असून जुना ठेकेदार काम करत नसल्याने केवळ बैठका घेण्याचे काम सुरू आहे. जिल्हा परिषदेतही शुक्रवारी याबाबत अध्यक्ष राहुल पाटील यांनी बैठक बोलावली होती. लवकरात लवकर काम सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

राज्य सरोवर संवर्धन कार्यक्रमातंर्गत तलाव संवर्धन करण्याच्या ३ कोटी १६ लाख रुपयांच्या या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी २९ ऑगस्ट २०१८ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला. माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या काळातील हे काम असून वरदलक्ष्मी कन्स्ट्रक्शनला हे काम देण्यात आले. पहिल्या टप्प्यात मिळालेल्या ६० लाखांतील ४२ लाख रुपये यांत्रिकी विभागाला देऊन या तलावातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला.

ठेकेदार कंपनीने यानंतर एका बाजूची भिंत बांधून काढली. यासाठी २८ लाख ५५ लाख रुपये खर्च आला. परंतु गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात ती कोसळली. त्यानंतर बांधकामाचे डिझाईन बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच महिन्यात या कामाचा कार्यारंभ आदेश देऊन तीन वर्षे होणार असली तरी काम मात्र ठप्पच आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, उपअभियंता ए. जी. डोंगळे, उपअभियंता एस. एस. बारटक्के, कनिष्ठ अभियंता एम. आर. भोसले, वडणगेचे सरपंच सचिन चौगले, ग्रामविस्तार अधिकारी पी. एस. बागुल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उत्तम साखळकर, माणिक जाधव, सूरज पाटील, दीपक व्हरगे उपस्थित होते.

चौकट

जाणीवपूर्वक ‘खो’ घालण्याचा प्रयत्न

वडणगे गावतलावाच्या कामात जाणीवपूर्वक ‘खो’ घालण्याचे काम सुरू आहे. डिझाईन बदलण्याच्या कामासाठी मी स्वत: तीनवेळा पुण्याला जाऊन आलो. प्रत्येक वेळी त्रुटी निघत असतील तर अधिकाऱ्यांना याची योग्य मांडणी करणे जमत नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. आम्ही तीनवेळा पुण्याला गेलो तेव्हा एकदाही आमच्या सोबत पाणीपुरवठा विभागाचा अधिकारी बरोबर आला नाही हे कशाचे द्योतक आहे, असा सवाल चौगले यांनी उपस्थित केला आहे.

चौकट

शिवसेना आणि कॉंग्रेस

शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या काळात या कामाला सुरुवात झाली होती. त्यानंतर नरके यांचा पराभव करून पी. एन. पाटील हे आमदार झाले. त्यावेळी ठेकेदार बदलला जाईल, अशी चर्चा होती. परंतु पी. एन. पाटील यांनी ठेकेदार न बदलता आहे त्यांच्याकडूनच चांगले काम करून घेण्याच्या सूचना दिल्या परंतु तरीही या कामात प्रगती झालेली नाही.

कोट

वडणगे तलावाबाबत जिल्हा परिषदेत बैठक झाली. यामध्ये ठेकेदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. लवकरात लवकर काम सुरू करण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत तरीही काम सुरू झाले नाही तर पुढील निर्णय घेतला जाईल.

राहुल पाटील, अध्यक्ष जिल्हा परिषद कोल्हापूर

Web Title: The work of Wadange Lake is in the political arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.