वाकोली धरणाचे काम गाळातच
By Admin | Published: June 8, 2015 12:13 AM2015-06-08T00:13:34+5:302015-06-08T00:48:08+5:30
नऊ वर्षे संथगतीने काम : लघु पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार
राजाराम कांबळे - मलकापूर -जिरायती शेती बागायती होईल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, हे स्वप्न डोक्यात ठेवून वाकोली (ता. शाहूवाडी) येथील ग्रामस्थांनी पाझर तलावासाठी आपल्या जमिनी दिल्या; मात्र लघु पाटबंधारे विभागाच्या गलथान कारभारामुळे धरणाचे काम नऊ वर्षे संथगतीने सुरू आहे.
तीन कोटी रुपयांचे धरण नऊ कोटी २८ लाख रुपयांवर गेले आहे. अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमतामुळे सहा कोटी २८ लाख रुपये जनतेच्या माथी मारले आहेत. या धरणाचे काम पूर्ण कधी होणार? असा सवाल शेतकरी वर्गातून होत आहे.
सह्याद्रीच्या डोंगर रांगांत शाहूवाडी तालुका वसला आहे. डोंगर कपारीत वाकोली गाव वसले आहे. शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या वतीने २००७ साली धरणाला मंजुरी मिळाली. शासनाकडून तीन कोटी रुपये मंजूर झाले. कामाला देखील सुरुवात झाली. तीन वर्षांत काम पूर्ण करावयाचे होते. मात्र, ठेकेदाराने तीन वर्षांत काम अपूर्णच ठेवले. पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे सध्या धरणाची किंमत ९ कोटी २८ लाख रुपये झाली आहे.
धरणाचे मातीकाम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूच्या सांडव्यांचे काम सुरू आहे. धरणाचे पिचिंग काम अर्धवट आहे. सध्या सांडव्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, ठेकेदार या बांधकामामध्ये क्रश सँड (ग्रिट)चा वापर करीत आहे. शासनाने या कामासाठी रिवाझ इस्टिमेंट ९ कोटी २८ लाखांचे केले आहे. ठेकेदार बांधकामामध्ये ग्रिटचा वापर करीत असल्यामुळे धरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होणार आहे. पाटबंधारे अधिकाऱ्यांचे पूर्णत: दुर्लक्ष आहे.
धरणाच्या बांधकामाला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. अधिकाऱ्यांनी वर्षाला दोन कोटी रुपये वाढवून घेतले आहेत. ही संपूर्ण रक्कम धरणाच्या बांधकामावर खर्च होणार का? ठेकेदाराला या विभागाने परक आॅर्डर कशी दिली? त्याच्यावर कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न आहेत.
अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमतामुळे येथील शेतकऱ्यांना मात्र शेतीच्या पाण्यासाठी वाट पहावी लागत आहे. पाण्याविना जमिनीतील पिके वाळू लागली आहेत. उन्हाळ्यात या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
शेतकऱ्यांना पाण्यापासून वंचित ठेवून शासनाच्या निधीचा गैरवापर करणाऱ्या अधिकारी व ठेकेदार यांची शासनाच्या पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी; अन्यथा शाहूवाडी तालुक्यात जनआंदोलन उभारण्याचा इशारा शिवसेनेचे तालुकाप्रमुख दत्ता पोवार यांनी दिला आहे.
आंदोलन छेडणार
धरणाचे काम अर्धवट ठेवणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यासाठी संबंधित मंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू प्रभावळकर यांनी सांगितले.
धरणाच्या बांधकामात ठेकेदाराने ग्रीट पावडर वापरली असल्यास कडक कारवाई केली जाईल.
- व्ही. डी. खोत
कनिष्ठ अभियंता, पाटबंधारे विभाग