शिवाजी पुलाच्या कामावर थेट सोलापुरातून देखरेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 11:11 AM2019-04-25T11:11:04+5:302019-04-25T11:14:23+5:30
पर्यायी शिवाजी पुलाचा मुख्य स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील किरकोळ कामे बुधवारपासून सुरू झाली. गेले दीड महिना या पुलाच्या कामांची देखरेख थेट सोलापूर उपविभागीय कार्यालयातून होत आहे. सोलापूर कार्यालयातील उपअभियंतापदाचा कार्यभार सांभाळत अशोकराव भोसले हे धावता कोल्हापूर दौरा करून पुलाच्या कामांवर लक्ष ठेवून आहेत.
तानाजी पोवार
कोल्हापूर : पर्यायी शिवाजी पुलाचा मुख्य स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील किरकोळ कामे बुधवारपासून सुरू झाली. गेले दीड महिना या पुलाच्या कामांची देखरेख थेट सोलापूर उपविभागीय कार्यालयातून होत आहे. सोलापूर कार्यालयातील उपअभियंतापदाचा कार्यभार सांभाळत अशोकराव भोसले हे धावता कोल्हापूर दौरा करून पुलाच्या कामांवर लक्ष ठेवून आहेत.
कोल्हापुरात त्यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार असला, तरी मुख्य अभियंता व शाखाअभियंता या दोन्हीही पदांवरील अधिकारी गायब असल्याने ही पदेही तेच सांभाळत आहेत. तरीही पूल मेअखेर पूर्ण करून वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने कामाला गती दिली आहे.
पर्यायी शिवाजी पुलाचे काम हे नेहमीप्रमाणे वादग्रस्तच स्थितीतून प्रवास करत आहे. प्रारंभीपासूनच या पुलाच्या कामात अडथळ्याची शर्यत सुरू आहे. चार महिन्यांपूर्वी पुलाच्या कामाचे उपअभियंता संपत आबदार हे वादग्रस्त बनल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यातून कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांची बदली झाली. त्यानंतर शाखाअभियंता प्रशांत मुंघाटे हे वरिष्ठांचा दबाव घेऊन उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले; पण तेही आता गेले दोन महिने पुलाकडे फिरकलेच नाहीत.
दि. १७ मार्चपासून सोलापूर उपविभागीय कार्यालयातील उपअभियंता अशोकराव भोसले यांच्याकडे कोल्हापुरातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार सोपविला. पुलाच्या मुख्य स्लॅबचे काँक्रीट टाकताना शाखा अभियंता मुंघाटे नसल्याने त्यांच्याजागी दि. २६ मार्च रोजी कोल्हापूर उपविभागाने यशवंत खोत आणि अनिल पाटील हे दोन नवे शाखाअभियंता दिले; पण स्लॅब टाकल्यानंतर हे दोन शाखाअभियंता तातडीने काढून घेतले.पुढील कामांसाठी भोसले यांच्या हाताखाली सहकारी नसल्याची स्थिती आहे.
अधिकाऱ्यांतील बेबंदशाहीत व समन्वयाचा फटका शिवाजी पुलाच्या कामाला बसत आहे. उपअभियंता अशोकराव भोसले हे थेट सोलापूर कार्यालयातून या कामाचा पाठपुरावा घेतात, आठवड्यातून एक दिवस कोल्हापूर दौरा करून सायंकाळी पुन्हा सोलापूरकडे रवाना होतात.
नकाशे उपअभियंता कार्यालयातच
अधिकाऱ्यांतील समन्वयाअभावी नवीन पुलाच्या कामाचे नकाशे, स्ट्रक्चरल डिझाईन व इतर कागदपत्रे ही राष्टÑीय महामार्ग उपविभागाकडे आहेत. ती उपअभियंता भोसले यांच्या हाती मिळालेली नाहीत.
पुलाची कामे शिल्लक
पुलाचा संरक्षण कठडा, पश्चिमेकडे रस्त्याचे खडीकरण-डांबरीकरण, पूर्वेकडे भराव, रस्त्याचे खडीकरण-डांबरीकरण, आदी कामे बाकी आहेत. केबल ओढण्याचे (पोष्ट टेन्शनिंग)चे काम बुधवारपासून सुरू असून,चार दिवसांत पूर्ण होईल. जरी पावसाळा सुरू झाला, तरीही पुलाचे मूळ काम पूर्ण झाल्याने त्याला पुराचा कोणताही धोका नाही.
भोसले मेअखेर निवृत्त
महिन्यापूर्वी कोल्हापुरातील अतिरिक्त पदभार सांभाळणारे अशोकराव भोसले हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. तत्पूर्वी हे पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचा त्यांचा कयास आहे.