‘जनसुराज्य’चा कार्यकर्ता भाजपच्या वाटेवर

By admin | Published: August 18, 2015 11:54 PM2015-08-18T23:54:41+5:302015-08-18T23:54:41+5:30

लाटकरांच्या तयारीने ढवळेंचा निर्णय : शिवसेना, भाजपकडूनही इच्छुकांची उमेदवारीची चाचपणी

Worker of 'Janasurajya' on BJP's path | ‘जनसुराज्य’चा कार्यकर्ता भाजपच्या वाटेवर

‘जनसुराज्य’चा कार्यकर्ता भाजपच्या वाटेवर

Next

प्रवीण देसाई - कोल्हापूर--महापालिकेतील पारंपरिक मित्र असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवाजी पार्क (प्रभाग क्र.१६) येथे उडी घेतल्याने येथील जनसुराज्य पक्षाच्या उमेदवाराची गोची झाली आहे. राष्ट्रवादीचे गटनेते राजेश लाटकर यांनी या प्रभागातून निवडणूक लढवायचा निर्णय घेतल्याने येथील ‘जनसुराज्य’चे कार्यकर्ते व माजी स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांनी पक्षाला ‘रामराम’ करीत भाजपकडे उमेदवारी मागितली आहे. येथून शिवसेनेचे उपशहरप्रमुख विश्वजित मोहिते यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. नगरसेविका अपर्णा आडके यांचे पती नितीन आडके यांनीही तयारी सुरू केली असून, पक्ष कुठला हा निर्णय त्यांनी गुलदस्त्यात ठेवला आहे. उत्तम पाटील-भेडसगांवकर यांनीही भाजपकडे चाचपणी सुरू केली आहे.
उच्चभ्रू, मध्यमवर्गीय लोकवस्तीसह झोपडपट्टीचा काही भाग अशी या प्रभागाची रचना असून येथे मध्यमवर्गीय नोकरदार, व्यापारी, उद्योगपती, कामगारांचे वास्तव्य आहे. नव्या प्रभाग रचनेत या प्रभागातील फे्रंडस् कॉलनी, चंद्रप्रभू कॉलनी हा भाग कमी होऊन मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर्स, अयोध्या टॉवर्स, जुने शाहूपुरी पोलीस ठाणे, दाभोळकर कॉर्नर, आदी भागाचा समावेश झाला आहे. सुमारे साडेसहा हजार मतदारसंख्येच्या प्रभागात यंदा तुल्यबळ लढत होण्याची चिन्हे आहेत.
राष्ट्रवादीचे नगरसेवक व गटनेते राजेश लाटकर यांनी शिवाजी पार्क येथून निवडणूक लढवायची तयारी सुरू केली आहे. त्यांचा सदर बाजार हा प्रभाग सर्वसाधारण महिलेसाठी खुला झाल्याने व त्यांचे निवासस्थानही या प्रभागात येत असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. नगरसेवक व स्थायी समिती सभापतिपदाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या प्रभागात अनेक विकासकामे केली आहेत. त्याचबरोबर आपल्या प्रभागापुरता विचार न करता शहराच्या विकासाबाबत असणारी नजर आणि काम करून घेण्याची हातोटी या गोष्टींमुळे या प्रभागातून ते नशीब आजमावणार असल्याची चर्चा आहे. आमदार हसन मुश्रीफ यांचे ‘विश्वासू कार्यकर्ते’ असल्याने राष्ट्रवादीची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.
आशिष ढवळे यांनी तयारी सुरू केली आहे. महापालिकेत राष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडी असली तरी उमेदवारी आपल्याला मिळणार नाही, हे गृहीत धरून त्यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांनी २००५मध्ये या प्रभागातून प्रतिनिधित्व केले आहे. ‘जनसुराज्य’च्या माध्यमातून स्थायी समिती सभापतिपदही भूषविले आहे. त्यांनी प्रभागात अनेक विकासकामे केली असून त्या बळावरच ते रिंगणात उतरले आहेत. गतनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अनिता ढवळे यांचा अवघ्या २१ मतांनी पराभव झाला होता.
या प्रभागाच्या विद्यमान नगरसेविका अपर्णा आडके यांचे पती नितीन आडके यांनी यावेळी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. कार्यकर्ते व भागातील नागरिक यांच्याशी चर्चा करून कुठला पक्ष निवडायचा याबाबत ते निर्णय घेणार असले तरी त्यांना काँग्रेस पक्षाकडून तिकिटाची विचारणा झाली आहे. २०००मधील निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब मोहिते यांच्याकडून चार मतांनी पराभूत झाले होते. सध्या पत्नी अपर्णा आडके प्रभागाचे नेतृत्व करत असून त्यांनी विविध विकासकामे केली आहेत.
विश्वजित मोहिते यांनीही तयारी सुरू केली आहे. ते आमदार राजेश क्षीरसागर यांचे ‘विश्वासू सहकारी’ असल्याने त्यांच्या माध्यमातून निधी आणून अनेक विकासकामे केली आहेत. गतनिवडणुकीत त्यांच्या पत्नी वंदना यांचा १५० मतांनी पराभव झाला होता. पराभव होऊनही मोहिते यांनी प्रभागात संपर्क कायम ठेवला आहे. उत्तम पाटील-भेडसगांवकर यांनीही उमेदवारी जाहीर करून तयारी सुरू केली आहे. ते गेल्या दहा वर्षांपासून प्रभागातील विविध सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग आहे. ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा लुब्रिकेंट्स असोसिएशनच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. ते भाजपकडून इच्छुक आहेत.


असा आहे प्रभाग
शिवाजी पार्क, स्टार बाजार, विक्रम हायस्कूल, ताराराणी फायर स्टेशन रोड दोन्ही साईट परिख पुलापर्यंत, दाभोळकर कॉर्नर, हॉटेल कोहिनूर स्क्वेअर, अमात्य टॉवर, हॉटेल अ‍ॅट्रिया ते एम. आर. देसाई हॉस्पिटल.

Web Title: Worker of 'Janasurajya' on BJP's path

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.