कार्यकर्ता एकनिष्ठतेसाठी दक्ष.. घरात नांदतायेत तीन-तीन पक्ष
By पोपट केशव पवार | Published: April 19, 2024 04:36 PM2024-04-19T16:36:56+5:302024-04-19T16:53:14+5:30
प्रमुख राजकीय घराण्यांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह
पोपट पवार
कोल्हापूर : खरे तर राजकारणात कोणीच कुणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो. त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या सोयीने भूमिका घेतात. वेळ पडेल तसे निर्णयही बदलत असतात. जिल्ह्यातील काही घराणी एकाच पक्षाची एकनिष्ठ राहत त्यांच्यातील एकीचे दर्शन देत असली तरी काही प्रमुख राजकीय घराण्यांमध्ये मात्र वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे दिसते. लोकशाहीत प्रत्येकाला एक वैचारिक भूमिका असल्याने जो तो त्याच्या भूमिकेनुसार निर्णय घेत असेल. मात्र, एकाच घरावरील वेगवेगळ्या पक्षांचे झेंडे कार्यकर्त्यांनाही बुचकाळ्यात टाकणारे ठरत आहेत.
काकी-पुतण्यांच्या वाटा वेगळ्या
जिल्ह्याच्या राजकारणावर एकेकाळी घट्ट पकड असलेल्या स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या घरात काकी-पुतण्याच्या वाटा वेगळ्या आहेत. माजी आमदार संध्यादेवी कुपेकर या महाविकास आघाडीकडे असताना त्यांचे पुतणे संग्राम हे मात्र महायुतीच्या उमेदवारासाठी जीवाचे रान करत आहेत. विशेष म्हणजे संग्राम यांचे सख्खे बंधू रामराजेही शाहू छत्रपती यांच्यासाठी चंदगड तालुका पालथा घालत आहेत.
रेडेकर माय-लेक कुणीकडे?
गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर या काँग्रेसच्या एकनिष्ठ असून त्या शाहू छत्रपती यांच्यासाठी लढत आहेत. त्यांचे चिरंजीव अनिरुद्ध मात्र शिंदेसेनेच्या मांडवाखाली आहेत. विशेष म्हणजे रेडेकर यांचे भाचे सुनील शिंत्रे हे उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख असून ते महाविकासच्या प्रचारात सक्रिय आहेत.
सासरे महायुतीत, जावई महाविकासकडे
गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे हे कागल तालुक्यातील महाविकास आघाडीची धुरा संभाळत आहेत. या माध्यमातून ते महायुतीच्या नेत्यांना थेट अंगावर घेत असताना दुसरीकडे त्यांचे सासरे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगवले मात्र महायुतीच्या प्रत्येक सभा, नियोजनाच्या बैठकांमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडताना दिसतात.
एक नरके महायुतीत, दुसऱ्यांची भूमिका कळेना
माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी युतीधर्म पाळत संजय मंडलिक यांच्यामागे ताकद उभी केली आहे. मात्र, त्यांचे चुलत बंधू गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी लोकसभेच्या आखाड्यातून माघार घेतली असून ते दोन दिवसांत भूमिका जाहीर करणार आहेत.
गडहिंग्लजच्या चव्हाण चुलते-पुतण्यांचा मार्ग वेगळा
गडहिंग्लज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण हे महायुतीची विचारधारा घरोघरी पोहोचवत असताना त्यांचे पुतणे पंचायत समितीचे माजी सभापती अमर चव्हाण मात्र महाविकास आघाडीची खिंड लढवत आहेत.
मामा महाराजांकडे, भाचा संभाळताेय मेहुण्याची बाजू
चंदगड तालुक्यात पै-पाहुण्याचे राजकारण मोठ्या प्रमाणात आहे. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक हे आमदार राजेश पाटील यांचे मेहुणे असल्याने ते मेहुण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढत आहेत. दुसरीकडे आमदार पाटील यांची सख्खी आत्या ही काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील यांना दिली आहे. मात्र, या तालुक्यात गोपाळराव पाटील यांच्याकडेच महाविकास आघाडीची धुरा आहे.
मेहुणे-पाहुणे पुन्हा विरुद्ध दिशेला
बिद्रीच्या निवडणुकीत एकमेकांसमोर उभे ठाकलेले के.पी.पाटील व ए.वाय.पाटील हे मेहुणे-पाहुणे लोकसभा निवडणुकीतही आमनेसामने आहेत. के.पी.हे महायुतीचा धर्म पाळण्यासाठी मंडलिक यांची संगत करत असताना ए.वाय. यांनी मात्र, महाविकास आघाडीची वाट निवडली आहे.