Kolhapur: पशुखाद्य कारखान्यात टाकी साफ करताना कामगाराचा गुदमरून मृत्यू, पाच जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 04:32 PM2024-05-06T16:32:25+5:302024-05-06T16:32:55+5:30
गडमुडशिंगी येथील महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यातील घटना
गांधीनगर : गडमुडशिंगी (ता.करवीर) येथील श्रीमहालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यात चारा वीट प्रकल्पातील पाण्याची टाकी साफ करतेवेळी संजय श्यामराव कांबळे (वय ५८, रा.वसगडे ता.करवीर) या सफाई कामगाराचा गुदमरून मृत्यू झाला, तर अन्य पाच जण विषारी वायुमुळे जखमी झाले.
राजेश जयवंत भांदिगीरे (वय ३२ रा.पुंगाव ता राधानगरी), रवींद्र शिवाजी मेकिरे (वय ३८ रा.गडमुडशिंगी ता.करवीर), रघुनाथ भैरू बारड (वय ५५, रा.साने गुरुजी वसाहत), संभाजी कृष्णा दाभाडे (रा.कोल्हापूर), दीपक भुई (पूर्ण पत्ता माहीत नाही) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी घडली.
अधिक माहिती अशी, गडमुडशिंगी येथील श्रीमहालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यात चारा वीट प्रकल्पालगत पाण्याची टाकी आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. ती साफ करण्याचे कंत्राट कोल्हापुरातील खासगी कंपनीला दिले होते. रविवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास दीपक भुई आणि संभाजी दाभाडे हे टाकी साफ करण्यासाठी टाकीत उतरले. त्यांनी टाकी धुण्यासाठी पावडर आणि पाणी टाकल्यामुळे टाकीत गॅस तयार होऊन त्यांच्या नाकात तोंडात गेल्याने दोघे जण गुदमरले. त्यांना बाहेर काढण्यासाठी सुपरवायझर राजेश भांदिगीरे आणि संजय कांबळे हे टाकीत उतरले.
त्यांनाही विषारी वायू सहन न झाल्याने अस्वस्थ वाटू लागले. हे टाकीवर असलेल्या रवींद्र मेकिरे आणि रघुनाथ बारड या माथाडी कामगारांनी पाहिले. त्यांनी टाकीतील लोकांना बाहेर काढले, पण त्यांनाही विषारी वायूने अस्वस्थ वाटू लागले. या सर्वांना उपचारासाठी तत्काळ रुग्णवाहिकेने सीपीआरला पाठविण्यात आले, पण संजय श्यामराव कांबळे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अन्य पाच जणांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबतची नोंद रात्री उशिरा गांधीनगर पोलिस ठाण्यात नोंदविण्याचे काम सुरू होते.
मृत संजय कांबळे यांच्या नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली. या प्रकरणी संबंधित दोषीवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी करवीरचे उपविभागीय अधिकारी सुजीत कुमार क्षीरसागर, गांधीनगरचे सपोनि दीपक जाधव यांनी नातेवाइकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.