केरळमध्ये कामगार अधिवेशनाला प्रारंभ
By admin | Published: November 6, 2014 11:38 PM2014-11-06T23:38:48+5:302014-11-07T00:09:16+5:30
२७ राज्यांतील प्रतिनिधी : संघटनेला मिळणार बळकटी
म्हाकवे : देशातील इमारत बांधकाम व इतर क्षेत्रांतील कामगारांच्या राष्ट्रीय अधिवेशनाला केरळ (कोजीकोडा) येथे अत्यंत उत्साहात सुरुवात झाली. देशातील २७ राज्यांतून कामगार संघटनांचे निवडक प्रतिनिधी या अधिवेशनामध्ये सामील झाले असून, या अधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी इंग्लंड, बांगलादेश, आदी पाच देशांतील प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत. त्याच्या उपस्थितीमुळे कामगारांच्या या राष्ट्रीय अधिवेशनाला व्यापक स्वरूप आले आहे, तर अधिवेशनाची चर्चा जगभर होणार आहे.
सकाळी नऊ वाजता कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ए. के. पद्मानभव यांच्या हस्ते लाल निशाण फडकावून अधिवेशनाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रत्येक राज्यामध्ये कामगारांसाठी संघटना कशा काम करतात. तेथील प्रशासनाकडून मिळणारा प्रतिसाद, यासह कामगारांचे संघटन करताना राहिलेल्या त्रुटी, याचा ऊहापोहही राज्य प्रतिनिधींकडून करण्यात आला. तसेच, प्रत्येक राज्यस्तरावर कामगारांसाठी राबविल्या जाणाऱ्या योजनांचाही आढावा घेण्यात आला.
दरम्यान, महाराष्ट्रातून कोल्हापूरचे कामगार संघटक कॉ. भरमा कांबळे, जिल्हा सचिव कॉ. शिवाजीराव मगदूम (कागल) व कॉ. संदीप सुतार (राधानगरी) यासह नाशिक व सोलापूर जिल्ह्यांतून प्रत्येकी एक प्रतिनिधी या अधिवेशनात सहभागी झाले आहेत.