कामगारांचा विराट मोर्चा

By admin | Published: October 14, 2016 12:48 AM2016-10-14T00:48:54+5:302016-10-14T01:17:37+5:30

तीन तास ठिय्या : दिवाळीपूर्वी बोनस न दिल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर ‘शिमगा’

Workers' Front Front | कामगारांचा विराट मोर्चा

कामगारांचा विराट मोर्चा

Next

कोल्हापूर : सर्व बांधकाम कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस न दिल्यास पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरासमोर ‘शिमगा आंदोलन’ करण्याचा इशारा गुरुवारी भारतीय कामगार संघटना केंद्र (सिटू)तर्फे देण्यात आला. बांधकामासह ऊस तोडणी, घरेलू मोलकरीण कामगारांच्या विविध मागण्यांसाठी शाहूपुरी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा काढून भरउन्हात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
दुपारी एकच्या सुमारास शिवाजी पेठेतील गांधी मैदान येथून मोर्चाला सुरुवात झाली. रणरणत्या उन्हात मोठ्या संख्येने बांधकाम, ऊस तोडणी, वाहतूक, कंत्राटी, घरेलू मोलकरीण कामगार सहभागी झाले होते. लाल झेंडे व मागण्यांचे फलक घेतलेल्या कामगारांकडून घोषणाबाजी करण्यात येत होती. गांधी मैदान, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, लक्ष्मीपुरी, स्टेशन रोडमार्गे शाहूपुरी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय या ठिकाणी मोर्चा येऊन या ठिकाणी आंदोलकांनी रणरणत्या उन्हात ठिय्या मारला. घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.
यावेळी आंदोलकांसमोर ‘सिटू’ जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. सुभाष जाधव म्हणाले, ऊस तोडणी कामगारांसाठी जानेवारी महिन्यात मंडळ स्थापन करण्याची घोषणा अस्तित्वात आलेली नाही. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार, ऊसतोडणी कामगार संघटना व सहाय्यक कामगार आयुक्त यांची संयुक्त बैठक घ्यावी.
जिल्हा सचिव भरमा कांबळे यांनी बांधकाम कामगारांना दिवाळीपर्यंत बोनस मिळाला नाही तर पालकमंत्री पाटील यांच्या घरासमोर ‘शिमगा’ आंदोलन करण्याचा इशारा दिला. २०१४ मध्ये कामगारांना ३००० रुपये बोनस देण्याची घोषणा सरकारने केली होती. त्यामध्ये अद्याप २००० जणांना लाभ मिळालेला नाही. गतवर्षी बांधकाम कामगारांना ५ हजार रुपये देण्याची घोषणा झाली; परंतु २२ हजारांपैकी एकालाही त्याचा लाभ मिळालेला नाही. यासह यावर्षी कामगारांना १० हजार रुपये बोनस दिवाळीपूर्वी दिला नाही तर कोणत्याही परिस्थितीत आंदोलन होणारच, असेही त्यांनी सांगितले. कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव म्हणाले, कामगार खात्यासाठी असणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी या कार्यालयाकडून केली जात नाही. त्यामुळे कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.
त्यानंतर मागण्यांचे निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना सादर करण्यात आले. ज्या बांधकाम कामगारांच्या ३ हजार लाभाची पडताळणी झालेली आहे. त्यांच्या सेवापुस्तिकेवर नोंद असूनही ती दिलेली नाही ती त्वरित द्यावी. ऊस तोडणी व वाहतूक कामगार, ऊस वाहतूकदारांची माथाडी मंडळात तातडीने नोंदणी सुरू करून त्यांना सेवापुस्तिका व ओळखपत्र देण्यात यावे. त्यांना प्रॉव्हिडंड फंड, बोनस, अपघात विमा, रजा आणि वैद्यकीय सेवा आदी लाभ सुरू करावेत. घरेलू कामगारांसाठी असलेल्या कल्याणकारी मंडळास निधी उपलब्ध करून द्यावा. त्यांना रेशनवर दरमहा ३५ किलो धान्य उपलब्ध करावे. कंत्राटी कामगारांना कामगार कायद्यांतर्गत सर्व सुविधा द्याव्यात, असे या निवेदनात म्हटले आहे. आंदोलनात प्रा. आबासाहेब चौगले, दत्ता माने, प्रकाश कुंभार, शिवाजी मगदूम यांच्यासह कामगार सहभागी झाले होते.


मोर्चाचे चौथे वर्ष
कामगारांच्या मागण्या अद्याप पूर्ण क्षमतेने पूर्ण न झाल्याने कामगार आयुक्त कार्यालयावरील मोर्चा दरवर्षी ताकदीने होत आहे. दिवाळीच्या तोंडावर निघणाऱ्या या मोर्चाचे हे चौथे वर्ष असून यावेळची संख्याही लक्षणीय होती. विशेष म्हणजे या मोर्चात बांधकाम कामगार आपल्या कुटुंबीयांसह सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची उपस्थिती दखलपात्र होती.
वाहतुकीची कोंडी
या आंदोलनात कामगार प्रचंड संख्येने सहभागी झाले. विविध तालुक्यांतून कामगार ट्रक, टेम्पो, जीप, दुचाकी अशा मिळेल त्या वाहनांतून संघटनेचे झेंडे लावूनच सकाळपासूनच दाखल झाले. वाहने मोकळ्या जागेत लावण्यात आली होती. मोर्चामुळे शहरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली, तर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केल्याने शाहूपुरीतील वाहतूक कोलमडली होती.

Web Title: Workers' Front Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.