कोल्हापूर: स्वाभिमानी आक्रमक, दत्तवाडमध्ये ऊस वाहतूक रोखली; ट्रॅक्टरची केली मोडतोड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 04:07 PM2022-10-19T16:07:49+5:302022-10-19T16:32:19+5:30
गळीत हंगामास सुरुवात होताच ऊस तोडणी करुन वाहतूक करणाऱ्याविरोधात स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक
मिलिंद देशपांडे
दत्तवाड : यंदाच्या हंगामात गाळप होणाऱ्या ऊसासाठी टनाला एकरकमी एफआरपी व जादा ३५० रुपये घेतल्याशिवाय कांड्याला कोयता लावू देणार नसल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत केली होती. दरम्यान, सद्या अनेक कारखान्यांनी गळीत हंगामास सुरुवात केली आहे. यासाठी ऊसतोड केल्याने दत्तवाड येथील स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. गुरुदत्त शुगरकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर हल्ला करून मोडतोड देखील केली. त्यामुळे ऊस आंदोलनाला आक्रमक वळण लागण्याची शक्यता आहे.
दत्तवाड ता. शिरोळ येथे गुरुदत्त शुगरमार्फत सकाळी ऊसतोड करण्यात आली. यावेळी गावातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी ऊसतोड करू नये अशी विनंती केली होती. पण ती डावलून ऊसतोड केल्याने दत्तवाड येथील स्वाभिमानी कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी दुपारी दोन वाजता शेतातून ऊस घेऊन गुरुदत्त शुगरकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरवर हल्ला करून त्याची मोडतोड केली.
बांबरवाडी वसाहत समोर ट्रॅक्टर आला असता स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ट्रॅक्टरचे हेडलाईट फोडून टाकले व स्वाभिमानीने जाहीर केलेला दर कारखान्यांनी जाहीर केल्याशिवाय ऊस वाहतूक न करण्याचा इशारा दिला. यावेळी विवेक चौगुले, प्रकाश मगदूम, सचिन हेमगिरे, श्रेणिक धुपदाळे, प्रमोद व्हसकल्ले, सूरज हेमगिरे, सुकुमार सिदणाळे, अजित चौगुले, रावसो धोतरे, शितल धुपदाळे, राजू व्हसकल्ले, बाबू मुल्ला, भुजबली हेमगिरे, पिंटू स्वामी यांच्यासह स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.