पक्ष कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांची लगबग
By admin | Published: January 14, 2017 12:36 AM2017-01-14T00:36:17+5:302017-01-14T00:36:17+5:30
जिल्हा परिषद रणांगण : फारसे न येणाऱ्यांचीही गर्दी; पहिल्या टप्प्यात उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी सुरू
समीर देशपांडे ल्ल कोल्हापूर
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता पक्षांच्या कार्यालयांतील कार्यकर्त्यांची लगबग वाढली आहे. याबरोबरच कार्यकर्ते नेत्यांच्या घरी आणि त्यांच्या वैयक्तिक कार्यालयांवरही धडकत असून, पहिल्या टप्प्यात उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी करण्याचे काम सुरू आहे. एरवी आंदोलनांच्या बैठकांना न दिसणारे चेहरेही आता उमेदवारीसाठी पक्षांच्या कार्यालयांमध्ये दिसत आहेत.
स्टेशन रोडवर राष्ट्रीय कॉँग्रेसचे कार्यालय गेली अनेक वर्षे आहे. या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या शेडवर अजूनही पत्रे घातले गेले नाहीत, हे वास्तव आहे. तरीही या ठिकाणी कॉँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस एस. के. माळी आणि बाबूराव कांबळे बसून असतात.
या निवडणुकीमुळे येथे कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे. उमेदवारीसाठीचे अर्ज देण्या-घेण्याचे काम सुरू आहे. अर्जासोबत पक्षाने ठरविलेला निधीही संकलित केला जात आहे. मेळावा, बैठका यानिमित्ताने येथे मोठी गर्दी होत असते. आता तर उमेदवारीसाठीची धावपळ असल्याने अर्ज देवाणघेवाणीसाठीच कार्यकर्ते येथे येतात.
मुलाखतीही येथेच घेतल्या जातील. मात्र, सूत्रे हलणार ती ‘गॅरेज’ आणि ‘अजिंक्यतारा’वरून एवढे मात्र निश्चित!
ताराबाई पार्कमध्ये वास्तव्यास असलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे यांच्या बेसमेंटमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा कार्यालय आहे. राष्ट्रवादी सत्तेत असताना येथून कार्यालय हलवून टाटा मॉलच्या पलीकडे नेण्याचे प्रयत्न झाले.
इमारतीचे आरेखन तयार करण्याबाबत सांगलीच्या एका आर्किटेक्टला काम देण्यात आले. मात्र, हे नियोजन कागदावरच राहिले. त्यामुळे खाडे यांच्या बेसमेंटमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे थांबून असतात. त्यांचीही अर्ज देवाणघेवाण सुरू आहे. त्यांचे बंधूही अनेकवेळा त्यांच्या मदतीला असतात. इथेही कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे.
जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर कधी नव्हे ते पहिल्यांदा बिंदू चौकातील सबजेलजवळच्या सुशीला सदनमध्ये धावपळ दिसू लागली आहे. याआधी जिल्ह्यात भाजपचे मोजके नेते आणि कार्यकर्ते असल्याने या कार्यालयाकडे फारशी गर्दी नसायची.
मात्र, आता याच कार्यालयात वर्दळ वाढली आहे. शुक्रवारी दुपारी येथे गेल्यानंतर भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई हे तालुकावार इच्छुकांच्या यादीवर शेवटचा हात फिरवित होते. जिल्हा सरचिटणीस शिवाजी बुवा त्यांच्या मदतीला होते. सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या कार्यालयाचे रूपडे बदलले आहे. तरीही आता पार्किंगसाठी अडचणीचे ठरत असलेले हे छोटे कार्यालय बदलण्याची कार्यकर्त्यांकडून मागणी होत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा कार्यालय सुरू केले आहे. मात्र, येथून अर्ज देवाणघेवाण सुरू न करता जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनीच तालुका पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्राथमिक आराखडा तयार केला आहे.
शिवसेनेचे जिल्हा कार्यालयच नाही
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार आणि मुरलीधर जाधव या तिघांकडे जिल्ह्यातील बारा तालुके विभागून देण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेनेचे मध्यवर्ती जिल्हा कार्यालय नाही.
शिवसेनेच्या आमदारांची निवासस्थाने हीच त्यांची कार्यालये आहेत. देवणे यांचे कार्यालय देवल क्लबसमोर, तर पवार यांचे पद्मा टॉकीजजवळ आहे. तेथे हे नेते आल्यानंतर शिवसैनिकांची लगबग वाढते; अन्यथा जिल्ह्याच्या दौऱ्यातच सैनिक त्यांना भेटतात.
वैयक्तिक भेटीसाठीही कार्यकर्ते घराकडे
याबरोबरच आमदार सतेज पाटील यांना भेटण्यासाठी त्यांच्या अजिंक्यतारा कार्यालयावर, माजी आमदार महादेवराव महाडिक यांना भेटण्यासाठी गोकुळ, ताराबाई पार्क किंवा राजाराम कारखान्यावर त्यांच्या वेळेप्रमाणे, पी. एन. पाटील यांना भेटण्यासाठी गॅरेजवर किंवा सकाळी त्यांच्या निवासस्थानी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.