कोल्हापूरात बांधकाम कामगारांचा इशारा मोर्चा, शिमगा आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 04:39 PM2018-10-22T16:39:41+5:302018-10-22T16:42:13+5:30
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर इशारा मोर्चा काढला.
कोल्हापूर : दिवाळीपूर्वी दहा हजार रूपयांचा बोनस द्यावा, मेडिक्लेम पूर्ववत सुरू करावे, आदी मागण्यांबाबत राज्य सरकारने दि. ४ नोव्हेंबरपर्यंत शासन आदेश काढावा, अन्यथा ऐन दिवाळीत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्यावतीने शिमगा करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक मंत्र्यांच्या कार्यालयासमोर असे आंदोलन केले जाईल, असा इशारा सेंटर आॅफ इंडियन ट्रेड युनियन्स्चे (सिटू) आॅल इंडिया उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी सोमवारी येथे दिला.
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर इशारा मोर्चा काढला.येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर इशारा मोर्चाच्या माध्यमातून आलेल्या आंदोलनकर्त्यांनी निषेध सभा घेतली.
राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर बांधकाम कामगारांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यातील दिवाळीपूर्वी दहा हजार रूपयांचा बोनस द्यावा. मेडिक्लेम योजना पूर्ववत सुरू करावी. ६० वर्षावरील बांधकाम कामगारांना पाच हजार रूपये पेन्शन द्यावी. लाभाची रक्कम दुप्पट करावी अशा काही मागण्या राज्य सरकारच्या पातळीवरील आहेत. त्याबाबतचा शासन आदेश सरकारने दि. ४ नोव्हेंबरपूर्वी काढावा, अन्यथा ऐन दिवाळीत पालकमंत्री पाटील यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून शिमगा केला जाईल, असा इशारा डॉ. कराड यांनी यावेळी दिला. त्याला उपस्थित कामगारांनी हात उंचावून घोषणा देत पाठिंबा दिला.
यानंतर लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भरमा कांबळे, सचिव शिवाजी मगदूम यांनी मार्गदर्शन केले. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांना मागण्यांचे निवेदन दिले. दरम्यान, सिटू आणि लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी एकच्या सुमारास दसरा चौकातून इशारा मोर्चा सुरू झाला.
हलगी-कैताळचा निनाद, ‘मेडिक्लेम बंद करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘कोण म्हणतयं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, अशा घोषणा देत रखरखत्या उन्हामध्ये मोर्चा पुढे सरकत राहिला. मोर्चातील महिला, पुरूष कामगारांच्या हातात मागण्यांचे फलक, संघटनेचे झेंडे होते. फोर्ड कॉर्नर, व्हिनस कॉर्नर मार्गे शाहुपुरीतील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय येथे मोर्चा आला.
या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कामगारांनी ठिय्या मारला. सरकारच्या निषेधार्थ आणि मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा देत त्यांनी परिसर दणाणून सोडला. या मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातून सुमारे १५ हजार बांधकाम कामगार सहभागी झाले. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.