'सायझिंग'चे कामगार आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार
By admin | Published: August 14, 2015 12:25 AM2015-08-14T00:25:47+5:302015-08-14T00:25:47+5:30
२४ व्या दिवशीही संप कायम : ९६० क्लेम अॅप्लिकेशनचे दावे दाखल
इचलकरंजी : सायझिंग कामगारांच्या संपाबाबत बोलणी करण्यासाठी कोल्हापूरला गेलेले कामगार संघटनेचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी अमित सैनी नसल्याने उपजिल्हाधिकारी संजय पवार यांना भेटून माघारी परतले. आता आज, शुक्रवारी पुन्हा हे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे.यंत्रमाग कामगारांच्या सुधारित किमान वेतनाच्या मागणीसाठी गेले २४ दिवस सायझिंग-वार्पिंग कामगारांचा संप सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी दिवसभरात किमान वेतनातील फरक मागणारे ९६० क्लेम अॅप्लिकेशनचे दावे सायझिंग कामगारांनी सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्याकडे दाखल केले. बुधवारी आणि गुरुवारी असे दोन्ही दिवस १२२९ दावे दाखल झाले आहेत. मोठ्या संख्येने दावे दाखल होत असल्याने ते भरून घेण्याचे काम राजीव गांधी सांस्कृतिक भवनात सुरू होते.कामगार नेते ए. बी. पाटील, आनंदराव चव्हाण, कृष्णात कुलकर्णी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले. मात्र, जिल्हाधिकारी सैनी हे पुण्याला गेल्यामुळे हे तिघेही निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांना भेटले. त्यांच्यात चर्चा झाली. मात्र, जिल्हाधिकारी सैनी यांच्यासमोरच निर्णय घेण्याचे ठरले. सध्या जमावबंदी असल्याने आज, शुक्रवारी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना भेटता येणार नाही. म्हणून कामगार प्रतिनिधींनी शुक्रवारी शिष्टमंडळाने येऊन भेटावे, अशी सूचना करण्यात आली. (प्रतिनिधी)
कायदेशीर प्रक्रिया, मग संप का?
शासनाने दिलेल्या हक्काप्रमाणे क्लेम अॅप्लिकेशन दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया कामगार संघटनेने चालू केली आहे. हे दावे वेगाने चालविण्याचे जिल्हाधिकारी व सहायक कामगार आयुक्तांनी मान्यही केले. कायद्याच्या प्रक्रियेत असलेल्या किमान वेतनासाठी आता संप चालू ठेवणे कितपत संयुक्तिक आहे, असा प्रश्न आता उद्योजक, व्यापारी व व्यावसायिकांतून विचारला जात आहे.