वंचितांसाठी कार्य हाच राजर्षी शाहू महाराजांसाेबत जुळलेला धागा, अभय बंग यांची भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 04:26 PM2023-06-26T16:26:36+5:302023-06-26T16:31:09+5:30
कोल्हापूरातील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा मानाचा राजर्षी शाहू पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समाजसेवक डॉ. अभय व राणी बंग यांना आज सोमवारी प्रदान करण्यात येत आहे.
कोल्हापूर : राजर्षी शाहू महाराजांनी जातिभेदाची कुंपणे ओलांडून बहुजन समाजाला शिक्षण व नोकऱ्यांची दारे उघडून दिली. त्यांच्या कार्याशी नाते सांगायला जातिभेदाविरुद्ध कार्य करायला हवे, तसे स्वत: जगायला हवे. जातिभेद व जातिभान दोन्ही माझ्या व राणीच्या मनातच कधी नव्हते. त्यामुळे ते स्वत:मधून काढावे लागले नाहीत. ही आम्हाला मिळालेली संस्कारांची देणगी आहे, तो आमचा पराक्रम नाही. पण समाजातील वंचितांसाठी कार्य करणे याबाबतीत कदाचित शाहू महाराजांशी आमचे नाते असावे अशा भावना डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केल्या.
कोल्हापूरातील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा मानाचा राजर्षी शाहू पुरस्कार वैद्यकीय क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे समाजसेवक डॉ. अभय व राणी बंग यांना आज सोमवारी प्रदान करण्यात येत आहे. यानिमित्त डॉ. बंग यांनी लोकमतकडे भावना व्यक्त केल्या.
ते म्हणाले, ‘सेवे’पासून सुरुवात करून पुढे ‘सक्षमता’ व अंतिमत: ‘स्वराज्य’ अशी ही दिशा आहे. या कामातून गावांमधील बालमृत्यू तर कमी झालेच, पण सोबतच न्यूमोनिया उपचार, नवजात-बालसेवा व आरोग्यदूत अशा पद्धतीही निर्माण झाल्या. दारूमुळे आदिवासी व स्त्रिया या दोन्हींची प्रचंड हानी होते. ‘दारूमुक्ती’ कशी साध्य करता येईल यावर गेली ३५ वर्षे हा आमचा प्रयत्न व ध्यास आहे. गडचिरोलीत काही प्रमाणात ते साध्य झाले आहे. शाहू महाराज असते तर त्यांनी या प्रयत्नांना आशीर्वाद व समर्थन दिले असते अशी माझी धारणा आहे.
आमच्या सामाजिक कार्याचे प्रेरणास्रोत आहेत महात्मा गांधी व गडचिरोली. विनोबा व आई-वडिलांकडून गांधीजी मला संस्कार म्हणून मिळाले. अमेरिकेला निघालेल्या माझ्या वडिलांना गांधीजी म्हणाले होते, - “भारत के देहातों में जाओ.” राणी व मी अमेरिकेत शिक्षण घेऊन परतल्यावर गडचिरोलीला जायचे ठरवले, त्या मागे गांधींच्या‘सेवा’ ची प्रेरणा होती. तिथे गेली ३७ वर्षे जे काही काम केले त्याची प्रेरणा गडचिरोलीच्या लोकांनी दिली. आदिवासी, लहान मुले व स्त्रिया या तीन वंचित घटकांसाठी आम्ही कार्य केले. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागातील जंगलात आमचे ‘शोधग्राम’ वसलेले आहे. तेथील रुग्णालयाद्वारे जिल्ह्यातील लोकांची सेवा घडते. अवती-भवतीच्या शंभर खेड्यात आमचं ‘आरोग्य-स्वराज्य’चं काम आहे. स्त्रियांना आरोग्य-सक्षम करून गावातील आरोग्य सांभाळायचे असा प्रयत्न आहे.
डॉ. बंग म्हणाले, सामाजिक कार्यात क्षितिज कधी हाती लागतच नाही. बालमृत्यू कमी करणे व आरोग्यदूत या पद्धती आता ‘आशा’च्या रूपात भारतभर पसरल्या आहेत. महाराष्ट्रातील, भारतातील दारू वाढते आहे, पण आता पस्तीस वर्षांनी जागतिक आरोग्य-विज्ञान आमच्या भूमिकेचे जणू समर्थन करायला लागलं आहे. ‘द लॅन्सेट’ व जागतिक आरोग्य संघटनांनी नुकतेच जाहीर केलं आहे की ‘शून्य दारू सेवन हेच सुरक्षित आहे’. भारत सरकारच्या आदिवासी आरोग्य तज्ज्ञ समितीचा मी अध्यक्ष होतो. आमच्या अहवालात आदिवासींच्या आरोग्याबाबत जे निष्कर्ष व शिफारसी आहेत त्यावर शासनाने अंमलबजावणी केली तर आदिवासी आरोग्याचा प्रश्न सुटेल.
वंचितांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचाव्यात यासाठी शासनाने पुढाकार घेऊन त्या व्यापकरीत्या व विनामूल्य उपलब्ध करून द्याव्यात. भारतात, विशेषत: ग्रामीण भारतात याची नितांत गरज आहे. हे करणे कठीण असल्याने राज्य सरकार व भारत सरकार प्रत्यक्ष आरोग्यसेवेऐवजी वैद्यकीय विमा कवच देण्याचा प्रयत्न करत आहेत. वैद्यकीय उपायांचा मार्ग अंतिमत: अतिखर्चिक व परावलंबन निर्माण करणारा आहे. या मार्गाचा अवलंब करणाऱ्या अमेरिकेत आज आरोग्यसेवेवर प्रतिव्यक्ती वर्षाला आठ लक्ष रुपये खर्च आहे. दुसरा मार्ग हा आरोग्य संवर्धनाचा व रोगप्रतिबंधाचा आहे. लोकांना आरोग्य-साक्षर, आरोग्य-सक्षम करून वैद्यकीय अतिरेकाऐवजी ‘आरोग्य-स्वराज्य’ साध्य करण्याचा आहे.
बदल स्वत:पासून...
पुरस्कारांमुळे लहान माणसाचं नाव मोठ्या माणसांशी जोडलं जातं. त्याच धर्तीवर, महात्मा गांधींच्या एका प्रसिद्ध वचनाचा आधार घेऊन मी असं म्हणण्याचं धाष्टर्य करतो की संदेश देण्याचा माझा अधिकार नाही. जे समाजात व्हावे असे वाटते तसे स्वत: जगण्याचा, करण्याचा आम्ही प्रयत्न केला.
भारतात रोग वाढले..
गडचिरोलीत व भारतात हृदयरोग, लकवा, कॅन्सर, मानसिक रोग व मणक्याचे रोग अशा आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत, यासाठी काय उपाय करावे याचा शोध आमची ‘सर्च’ संस्था घेते आहे. त्यासोबतच ‘निर्माण’ हा युवांसाठी उपक्रम व ‘मुक्तिपथ’ हे दारू व तंबाखू कमी करण्याचे जिल्हाव्यापी अभियान सुरू आहे.