जंगल समृद्धीसाठी वनव्यवस्थापन समित्यांची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:23 AM2021-03-28T04:23:08+5:302021-03-28T04:23:08+5:30
आजरा : आजरा तालुक्यात गेली अनेक वर्षे जंगली प्राणी आणि शेतकरी यांच्यात जीवघेणा संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज ...
आजरा : आजरा तालुक्यात गेली अनेक वर्षे जंगली प्राणी आणि शेतकरी यांच्यात जीवघेणा संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज परिक्षेत्र वनाधिकारी आजरा यांच्या कार्यालयात बैठक झाली. बैठकीत जंगले समृद्ध झाली तरच जंगली जनावरांचे खासगी जमिनीवरील अतिक्रमण थांबेल. त्यासाठी वनव्यवस्थापन समित्या, चळवळीचे कार्यकर्ते, पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यासह मुख्य वनसंरक्षक यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा घेण्याचा निर्णय श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
शेतकरी आणि जंगली प्राणी यांच्यामधील संघर्ष कायमस्वरूपी संपवायचा असेल तर त्यासाठी जंगलाच्या समृद्ध करण्याशिवाय दुसरा कोणताही शाश्वत पर्याय दिसत नाही म्हणून आजरा तालुक्यात हा प्रायोगिक तत्त्वावर जंगल समृद्धीकरण करून पश्चिम घाटामध्ये एक नवे मॉडेल उभे करावे, अशी मागणी वारंवार केली होती. याबरोबरच जंगली प्राणी केलेल्या पिकांच्या नुकसानीचा योग्य मोबदला तातडीने मिळण्यासाठी किमान पन्नास हजारपर्यंतच्या नुकसानीचे पेमेंट करण्याचे अधिकार तालुका स्तरावरील अधिकाऱ्याला मिळावेत. त्यामुळे पीक नुकसानीबाबत होणारी दिरंगाई टळेल अशीही चर्चा झाली. जंगली प्राण्यांकडून रात्रीच्यावेळी होणारे हल्ले आणि शेती पिकाचे नुकसान लक्षात घेऊन शेतीपंपासाठी दिवसा वीज द्यावी अशी मागणी गेली आहे. हत्ती व गवा बाधित क्षेत्रांतील गावांना रात्रीऐवजी दिवसा वीज देण्याबाबत तहसीलदार आजरा आणि कार्यकारी अभियंता महावितरण यांना लेखी कळविण्याचे परिक्षेत्र वनाधिकारी अमरजित पवार यांनी मान्य केले.
बैठकीला परिक्षेत्र वनाधिकारी अमरजित पवार, श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई, प्रकाश मोरुस्कर, दशरथ घुरे, नारायण भडांगे, विष्णू मांजरेकर, विजय बांदेकर, नारायण राणे, अशोक बांदेकर, विजय पाटील हे कार्यकर्ते उपस्थित होते.