वर्कशॉप की परमिट रूम?
By admin | Published: June 21, 2016 12:54 AM2016-06-21T00:54:53+5:302016-06-21T01:17:44+5:30
आयुक्तांचे चौकशीचे आदेश : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा प्रताप
कोल्हापूर : सायंकाळ झाली की महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पाय वर्कशॉपकडे वळतात. कोणाला तरी वाटावे की हे कर्मचारी ड्युटीवरच जात आहेत; परंतु अंधार पडला की यांची वेगळीच ड्युटी सुरू होते. ग्लास काढले जातात, बाटल्या फुटतात. सिगारेटची धुरांडी पेटतात. वर्कशॉपमध्येच खुले परमिट रूम सुरू होते. रात्री जाताना बाटल्या, ग्लास तेथेच टाकल्या जातात. सोमवारी आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासमक्षच महापौर आणि अन्य नगरसेवकांनी त्याचा पर्दाफाश केला.
दरम्यान, शेकडो बाटल्या पाहून आयुक्तही थक्क झाले. त्यांनी चौकशी करून जबाबदारअसणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
नगरसेविका शोभा कवाळे यांच्याशी उद्धट वागणूक दिल्यामुळे संतप्त झालेल्या कॉँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला, स्थायी सभापती मुरलीधर जाधव, परिवहन सभापती लाला भोसले, महिला बालकल्याण सभाती वृषाली कदम, नगरसेवक प्रताप जाधव यांच्यासह महानगरपालिकेच्या वर्कशॉपची पाहणी केली. वाहने बंद का आहेत, याची माहिती अभियंता आयरेकर यांच्याकडून घेतली. कार्यालयाच्या बाहेरच काही दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे सापडल्यामुळे अभियंता आयरेकर यांना जाब विचारला; परंतु ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.
सर्व पदाधिकारी पाहणी करत करत गणपती मंदिराच्या मागील बाजूस गेले. त्याठिकाणी रिकाम्या असलेल्या एका मोठ्या सिंटेक्सच्या टाकीत मोठ्या संख्येने दारूच्या बाटल्या आढळल्या. बाटल्यांची संख्या काही शेकड्यांत होती. कोणी तरी साठवून ठेवल्या असाव्यात, अशी आधी शंका आली. अधिक चौकशी करता काही कर्मचाऱ्यांनी येथे रात्रीच्या वेळी महानगरपालिकेचेच कर्मचारी दारू पित बसलेले असतात. जाताना बाटल्या येथेच ठेऊन जातात, असे सांगितले. आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना हा प्रकार दाखविण्यात आला. त्यावेळी त्यांनीही उपस्थित कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली. काही कर्मचाऱ्यांचा हा प्रताप असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारामुळे आयुक्तही थक्क झाले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)
एक वाजल्यापासून गाड्या वर्कशॉपकडे
आज, सोमवारी आयुक्त, महापौर पाहणी करीत असतानाच दुपारी एक वाजल्यापासून पाणीपुरवठा, आरोग्य विभागाकडील वाहने वर्कशॉपकडे यायला लागली. वास्तविक वाहनचालकांची कामाची वेळ दुपारी दोन वाजता संपते; पण एक वाजल्यापासून वाहने आत यायला सुरुवात झाल्याचे पाहून आयुक्तांनी आश्चर्य व्यक्त केले. आयुक्तांनी त्याचीही नोंद घेतली.
वर्कशॉपमधील काही कर्मचारी रात्री दारू पित बसलेले असतात. ट्रकवरील चालकही त्यामध्ये सहभागी आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने हा प्रकार घडत आहे. त्याला आळा घालणे आवश्यक आहे.
- शारंगधर देशमुख, गटनेता.