...हद्दवाढप्रश्नी ‘त्या’ गावांची कार्यशाळा

By Admin | Published: March 25, 2015 12:35 AM2015-03-25T00:35:58+5:302015-03-25T00:39:55+5:30

पी. शिवशंकर : एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नियोजन, महापालिका हद्दवाढीचे फायदे समजावून सांगणार

... workshops of those 'villages' workshop | ...हद्दवाढप्रश्नी ‘त्या’ गावांची कार्यशाळा

...हद्दवाढप्रश्नी ‘त्या’ गावांची कार्यशाळा

googlenewsNext

कोल्हापूर : ‘राजकीय विरोध’ या कारणास्तव कोल्हापूरच्या हद्दवाढीचा प्रस्ताव नाकारत असल्याचे पत्र शासनाने महापालिका प्रशासनास दिले. हद्दवाढ होणार किंवा नाही, झाल्यास किती गावे समाविष्ट होणार, संभाव्य गावांची समजूत कशी काढणार, शासनाकडून या सर्वांना कसा प्रतिसाद मिळेल, याबाबत अनेक प्रश्न शहरवासीयांत आहेत. या पार्श्वभूमीवर शासनास हद्दवाढीचा पुनर्प्रस्ताव सादर करण्यापूर्वी एप्रिल महिन्यात संभाव्य सर्व १७ गावांतील ग्रामपंचायत सदस्यांसह प्रमुख नागरिकांची कार्यशाळा घेणार आहे. त्यामध्ये हद्दवाढीचे फायदे समजावून सांगणार असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
शहराची हद्दवाढ होण्याकरिता महानगरपालिका पातळीवर तसेच शहरातील नागरिक, विविध संघटना यांनी अनेक वर्षांपासून बऱ्यापैकी प्रयत्न केले आहेत; परंतु त्यांच्या प्रयत्नांवर मर्यादा पडल्या. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळेच हद्दवाढीला पुन्हा ‘खो’ बसला. ग्रामीण जनतेलाही महानगरपालिकेच्या सुविधा पाहिजेत; परंतु शहरात यायला नको वाटते. रखडलेली हद्दवाढ करताना तोंडदेखलेपणा नको. चार-दोन गावांचा होणारा शहरातील समावेश नगरसेवकांना नको आहे.
शहराची हद्दवाढ न झाल्यामुळे जसा शहराला फटका बसत आहे, तसा तो ग्रामीण भागातील जनतेलाही बसलेला आहे, हे आता सर्व पातळ्यांवर पटवून सांगण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शहराची हद्द वाढली की, केवळ शहराला फायदा होईल आणि मूळच्या ग्रामीण भागातील जनतेवर अन्याय होईल, अशी भीती पद्धतशीरपणे बिंबविण्यात आली आहे. ही भीती व फायद्याचे मुद्दे समजावून सांगण्यासाठीच आयुक्त पी. शिवशंकर हे पुढाकार घेणार आहेत. ग्रामीण जनतेच्या हद्दवाढीमुळे होणाऱ्या समस्या समजावून घेणे व त्यांचे निराकरण करण्याचे उपाय सांगणे.
तसेच अंमलबजावणीची तरतूद कशा प्रकारे करता येईल या माहितीची देवाणघेवाण करण्याकरिता आयुक्तांनी हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या संभाव्य गावांतील प्रमुखांची कार्यशाळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा झाल्यानंतर या कार्यशाळेचे नियोजन केले जाणार आहे.


हद्दवाढ रोखण्यामागे राजकीय नेत्यांच्या हिशेबाचे राजकारण हे प्रमुख कारण आहे. आपला पारंपरिक मतदार शहरी भागात गेला, तर आपल्याला निवडणुका जिंकणे काहीसे अवघड होऊ शकते, ही राजकारण्यांची भीती आहे. त्यातूनच त्यांनी ग्रामीण जनतेत हद्दवाढीबाबत गैरसमज निर्माण केले आहेत. आयुक्त प्रशासकीय बाजू सांभाळत असतानाच नगरसेवकांनी राजकीय बाजू सांभाळण्याची गरज असल्याची चर्चा आहे.


कार्यशाळा घेऊन संभाव्य गावांत हद्दवाढीबाबत असणारे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करू. कार्यशाळेद्वारे हद्दवाढीमुळे होणारे फायदे समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.- पी. शिवशंकर, आयुक्त

Web Title: ... workshops of those 'villages' workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.