जागतिक एडस दिन विशेष : ‘एडस’ येतोय नियंत्रणात, रुग्णांचे प्रमाण घटले, सकारात्मक चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 03:31 PM2017-11-30T15:31:03+5:302017-11-30T15:36:06+5:30
कोल्हापूर : गेल्या दहा पंधरा वर्षात एच.आय.व्ही(एडस) या आजाराने ठळकपणे नजरेत भरणारी रुग्णांची संख्या या दोन-चार वर्षात बरीचशी कमी आली आहे.जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या माध्यमातून होत असलेल्या प्रयत्नांमुळे हा आजार नियंत्रणात येत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. शुक्रवारी जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर हे आशादायी आहे.
प्रवीण देसाई
कोल्हापूर : गेल्या दहा पंधरा वर्षात एच.आय.व्ही(एडस) या आजाराने ठळकपणे नजरेत भरणारी रुग्णांची संख्या या दोन-चार वर्षात बरीचशी कमी आली आहे.
जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या माध्यमातून होत असलेल्या प्रयत्नांमुळे भितीदायक असणारा व समाजापासून माणसाला तोडणारा हा आजार नियंत्रणात येत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. शुक्रवारी जागतिक एड्स दिनाच्या पार्श्वभूमीवर हे आशादायी आहे.
देशात महाराष्ट्र व महाराष्ट्रात मुंबई,पुणे, सांगली पाठोपाठ कोल्हापूरमध्ये एच.आय.व्ही.चे रुग्ण सर्वाधिक आढळले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एच.आय.व्ही.सह जगणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असण्यामध्ये सधनता, स्थलांतरीत कामगार, पर्यंटकांचे वाढलेले प्रमाण, सीमेलगतची भौगोलिक परिस्थिती व केंद्रीत लक्ष्यगट अशी विविध कारणे आहेत.
एडस सारख्या आजारामध्ये कोल्हापूरचे नाव राज्यात पहिल्या पाचमध्ये असणे हे शोभनीय नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून जनजागृतीसाठी सर्वच पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
याची परिणीती म्हणजे २००७ मध्ये एच.आय.व्ही. संसर्गितांचे असणारे १०.०७ टक्के हे प्रमाण सध्या ०.९ टक्क्यांवर आले आहे. हे सकारात्मक चित्र आहे.
रुग्णांची संख्या कमी होण्यामागे आय.ई.सी. अंतर्गत शिक्षण, संवाद या बाबींचा मोलाचा सहभाग आहे. यामाध्यमातून आतापर्यंत विविध स्पर्धा, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, चित्ररथ, प्रश्नमंजुषा घेण्यात येत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात एडस नियंत्रणासाठी २६ एकात्मिक समुपदेशन चाचणी (आय.सी.टी.सी) केंद्रे कार्यरत असून या ठिकाणी मोफत समुपदेशन व चाचणी केली जात आहे. याशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे व साधारणत: ७४ खासगी दवाखाने व प्रयोगशाळा या ठिकाणी एच.आय.व्ही.ची मोफत तपासणी केली जाते.
यामध्ये सामान्य लाभार्थी, गरोदर माता, क्षयरोग रुग्ण यांच्या चाचणीपूर्व समुपदेशनानंतर मोफत एच. आय.व्ही तपासणी केली जाते. यामध्ये जर एच.आय.व्ही.चा रुग्ण आढळल्यास त्याचे चाचणीपूर्व समुपदेशन करुन ए.आर.टी. केंद्राकडे पाठविले जाते.
रुग्णाने घ्यावयाचा आहार, घ्यावयाची काळजी आदीबाबत समुपदेशन करुन त्यांचे जीवनमान वाढवून त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
‘एडस’नियंत्रणाच्या चळवळीत ५०० तरुणांची फौज
‘एडस’ आटोक्यात आणण्यासाठी एडस नियंत्रण विभागाकडून होत असलेल्या प्रयत्नांच्या माध्यमातून सुमारे ५०० महाविद्यालयीन तरुणांची फौज निर्माण झाली आहे. येणाऱ्या काळात त्यांच्या माध्यमातून महाविद्यालये व गावपातळीवर कार्यक्रम घेऊन जनजागृती केली जाणार आहे.
‘संवेदना’तून ‘शून्य’ गाठण्याचा प्रयत्न
सामाजिक बांधिलकीतून ‘संवेदना’ हा एडस जनजागृतीपर कार्यक्रम राबविला जात असून या माध्यमातून २०१४मध्ये ‘आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’, २०१५मध्ये संवेदना चित्ररथ, २०१६मध्ये संवेदना वेध शून्य गाठण्याचा व २०१७मध्ये युवा संवेदना हे उपक्रम राबविले गेले.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एडस नियंत्रणात आणण्यात चांगले यश मिळाले आहे. हे प्रमाण शून्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न सुुुरु आहे. शासनाकडून निधी बंद झाला असला तरी वारांगणा सखी संघटना, तृतीय पंथीयांची मैत्रेय संघटना यांना सामाजिक बांधिलकी म्हणून विविध उपक्रमात सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न आहे.
-दीपा शिपूरकर,
जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक