Kolhapur: जागतिक बँकेचे पथक पन्हाळ्यात; भूस्खलन प्रवण क्षेत्रासह विविध ठिकाणी दिली भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 06:45 PM2024-06-27T18:45:08+5:302024-06-27T18:45:50+5:30
भूस्खलनाच्या घटनांची तीव्रता कमी करण्यासाठीच्या उपाय योजनेवर चर्चा
पन्हाळा : पन्हाळा व परिसरात भूस्खलन व दरडी कोसळण्याच्या घटना, त्यापासून होणाऱ्या अनेक प्रकारच्या नुकसानीची तीव्रता कमी करण्यासाठी घ्यावी लागणारी दक्षता व उपाय योजने बाबत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव राज्य शासनामार्फत जागतिक बँकेकडे सादर केला जाणार आहे. यासाठी जिल्हा अपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग यांचे सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर अहवाल तयार करणार आहे. त्यासाठीची स्थळ पाहणी करण्यासाठी जागतिक बँकेच्या पथकांने पन्हाळगडावर भूस्खलन प्रवण क्षेत्रासह विविध ठिकाणी भेट दिली.
भूस्खलन व दरडी कोसळण्याच्या घटनांची तीव्रता कमी करण्याकरिता राबविले जाणारे प्रकल्प व उपायासाठी जागतिक बँकेकडून अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने पाहणी करण्यासाठी चारजणांचे पथक आले होते. जागतिक बॅंकेच्या पथकात बँक प्रमुख जोलांता वोटसन, पर्यावरण तज्ञ नेहा व्यास, दक्षिण आशिया अर्बन रेझीलीयंस सल्लागार जर्क गेल, जिल्हाअपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांचा समावेश होता. पथकाने मोठ्या प्रमाणात झालेल्या भूस्खलन व दरडी कोसळलेल्या ठिकाणांची पाहणी केली.
पन्हाळा तहसिलदार माधवी शिंदे जाधव यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. यावेळी सन २०१९ ते २०२१ या काळात झालेल्या भूस्खलन व दरडी कोसळलेल्या ठिकाणांची व झालेल्या नुकसानीची व त्यावेळी केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भूस्खलन झालेल्या ठिकाणी भेट देऊन सद्यस्थिती जाणून घेतली. त्यानंतर भूस्खलनाच्या घटनांची तीव्रता कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. गडावरील पाण्याचा निचरा करणाऱ्या मार्गात अडथळे निर्माण झाल्याने, तसेच तटबंदीवर वाढलेली झाडे झुडपे ही दोन प्रमुख कारणे आहेत. यावर शिष्टमंडळाने उपाय योजना करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी कनिष्ठ भु वैज्ञानिक कोल्हापूर राहुल खंदारे, मुख्याधिकारी चेतनकुमार माळी, सार्वजनिक बांधकामचे उप अभियंता सचिन कुंभार, शाखा अभियंता अमोल कोळी, आर्किटेकट असोसिएशन अध्यक्ष अजय कोराणे, माजी उप नगराध्यक्ष चैतन्य भोसले, रविंद्र धडेल, रामानंद गोसावी व नागरिक उपस्थित होते.